मुंबई, 31 जानेवारी : सध्या सोशल मीडियावर हिजाब घालून रॅप करणारी तरूणी चर्चेत आहे. सानिया मिस्त्री असं या 'गली गर्ल' रॅपरचं नाव असून ती फक्त 16 वर्षांची आहे. मुंबईतल्या एका गरीब कुटुंबात जन्मलेली सानिया सध्या स्टार बनलीय. या लहान वयात यश मिळवण्यासाठी तिनं मोठा संघर्ष केलाय. ही सानिया कोण आहे? तिचा आजवरचा प्रवास कसा झाला? हे पाहूया...
कसा आहे सानियाचा प्रवास?
मुंबईतल्या गोवंडी शिवाजीनगर भागातील झोडपट्टीमध्ये सानिया राहते. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. तर तिची आई घराला हातभार लावण्यासाठी लहान-मोठी काम करते. सध्या 12 वीत असलेल्या सानियाच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. या प्रकारचं रॅप साँग रेकॉर्ड करण्यासाठी सुरूवातीला तिच्याकडं मोबाईल देखील नव्हता. त्यावेळी तिनं मित्र-मैत्रीणींची मदत घेऊन रॅप रेकॉर्ड केलं. आज तिच्या रॅप साँगचे लाखो फॅन्स आहेत.
कवयित्री ते रॅपर
सानियाला घरच्या गरिबीमुळे अनेक अडचणी लहान वयातच सहन कराव्या लागल्या. तिच्या घरात आणि आजूबाजूलाही साधारण परिस्थिती होती. या सर्व वातावरणात तिनं लहानपणापासूनच कविता लिहायला सुरूवात केली. 'मी लहानपणापासूनच गरिबी पाहिलीय. मी सुरूवातीला कविता करत असे. मला मैत्रिणींनी रॅपची माहिती दिली. मी तेव्हापासून रॅप तयार करून म्हणत आहे. मला माझ्या मैत्रिणींनी रॅपचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आणि पोस्ट करण्यात मदत केली आहे.
Rolling Stone च्या प्ले लिस्टमध्ये झळकला सोलापूरचा 'गली बॉय', पाहा Video
माझ्या घरी सुरूवातीला याबाबत काही माहिती नव्हतं. त्यांना याबाबत समजल्यावर आईनं मला नेहमीच पाठिंबा दिलाय. मला आजूबाजूचे लोकं रॅपबद्दल अनेक प्रश्न विचारत. माझे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
सध्या रॅप क्षेत्रात मुली आहेत. पण, मुलींना हा प्रकार जास्त आवडतं नाही. ज्या मुली रॅप करतात त्यांना प्रत्येक जण ओळखतो. मुलींनी या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. तसेच आता रॅप साँग मधून शिवीगाळ किंवा अपशब्द वापरले जातात. मी सुरुवातीला रॅप करायची तेव्हा माझ्या परिसरातली लहान मुलं मला तू रॅप नाही तर गाणं म्हणतेस असं म्हणतं. रॅपमध्ये अपशब्द वापरणे हा सध्या ट्रेंड आहे.
मी सामाजिक विषयांवर रॅप करते. माझ्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या मंडळींना आता माझा अभिमान वाटतो, असंही सानिया मिस्त्रीनं यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Local18, Mumbai, Success story