मुंबई, 22 ऑगस्ट : राज्यभरात गणरायाचं भक्तीभावाने आगमन होत आहे. सर्वसामन्यांपासून ते राजकीय नेते, सेलिब्रिटींच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. परंतु, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घरी गणपतीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेवरून सोशल मीडियावर वाद पेटला आहे.
प्रविण तरडे यांनी आपल्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरच्या गणपतीसाठी तरडे यांी पुस्तकांचे डेकोरेशन केले आहे. गणरायाच्या मूर्तीच्या बाजूला चारही बाजूने पुस्तकं सजवली आहे. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आहे आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले आहे.
संविधान गणेश मूर्तीच्या पाटाखाली ठेवल्याने प्रविण तरडे हे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे. सोशल मीडियावर प्रविण तरडे यांच्यावर लोकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला? असा जबाबच प्रवीण तरडेंना विचारण्यात आला.
सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यामुळे अखेर प्रविण तरडे यांनी तो फोटो डिलीट करून टाकला आहे. त्यानंतर नव्याने संविधान पाटाखाली नसलेला फोटो गणपती प्रतिष्ठापनेचा फोटो पोस्ट केला आहे.
परंतु, प्रविण तरडे यांनी हा मुद्दामहून खोडसाळपणा केला, असा आरोप करत सोशल मीडियातील लोकांनी तरडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
प्रवीण तरडेवर कारवाई करा म्हणून सोशल मीडीयावर जोरदार मागणी केली जात आहे.
प्रवीण तरडे भारतीय संविधान हे फक्त पुस्तक नाहीये अन तू हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला आहे.
प्रत्येक वेळेस तुझी नीच मानसिकता का दाखवतो. pic.twitter.com/Ie3q4tWjdd
— Pratik Patil (@Liberal_India1) August 22, 2020
याआधीही CAA आंदोलनावरुन प्रविण तरडे यांनी केलेल्या पोस्टमुळे वाद पेटला होता. पत्रकार राजू परुळेकर यांच्या पोस्टला कमेंट करताना त्यांनी भाजपची बाजू घेतली होती. त्यामुळे लोकांनी तरडे यांना चांगलेच ट्रोल केले होते. त्यावेळीही तरडे यांना आपली पोस्ट डिलीट करावी लागली.