मुंबई, 03 डिसेंबर : मराठमोळे अभिनेते किरण माने (kiran mane )सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. फेसबुकवर नेहमी किरण माने त्यांच्या लेखणीने प्रभावीत करत असतात. किरण माने सध्या मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील म्हणजे साजरिच्या वडिलांची भूमिका साकरत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून किरण माने विलास पाटील म्हणून महाराष्ट्राच्या घरघरात पोहचले. या भूमिकेने त्यांना ओळख, प्रसिद्धी दिली. त्यांनी यासंबधीचा एक व्हिडिओ शेअर करत एक जबरदस्त किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
किरण माने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यासोबत एक पोस्ट देखील केली आहे. सध्या त्यांच्या या पोस्टची चर्चा सगळीकडे रंगली आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की,काल रात्री 12.30 / 1 वाजता पोवई नाक्यावर एकटा फिरत असताना पाचसहा पोरं "विलास पाटीSSSSल... विलास पाटीSSSSSSSल" असं आनंदानं वरडत आली.
...मध्यरात्री गाडी काढून सातारच्या सुनसान रस्त्यांवरनं फिरनं ह्यो माझा आवडता छंद !...शुटिंगमधनं सुट्टी मिळाल्यावर पयला सातारा गाठतो मी. रात्री जेवन झाल्यावर मध्यरात्री नाक्यावर नायतर राजवाड्यावर गाडी लावायची...आन् रिकाम्या, शांत, निवांत पहुडलेल्या वरच्या आनि खालच्या रोडवरनं चालत फिरन्यात जे सुख हाय त्याचा नाद नाय करायचा.. जगात भारी भावांनो !!
वाचा :अरे, हे तर काहीच नाय; आता पाठक बाईदेखील करणार सूत्रसंचालन
असाच फिरत असताना काही पोरांनी मला बघितलं आन् गराडा घातला... "सर, तुमचं काम लै नादखुळा असतं.. माझी आई तुमची लै मोट्टी फॅन हाय. प्लीज तिच्याशी व्हिडीओकाॅलवर बोला. ती तुमाला बगून येडीच हुईल."...
मी म्हन्लं, "अरे एवढ्या रात्री कशाला उठवतोयस आईला?"..."नाय नाय सर, आता सुट्टी नाय." असं म्हनत कुनी आईला झोपेतनं उठवुन सांगीतलं, "आई, मला कोन भेटलं बघ."... तिकडून "आगंबयाSS ईलास पाटील?! नमस्कार ओ. तुमचा कार्यक्रम लै आवडतो आमाला." वगैरे सुरू झालं. मग कुनाच्या बहिनीशी, कुनाच्या वडिलांशी बोलून झालं..."सर तुमी सापडत नाय कधी..आता घावलाय तर सुट्टी नाय तुमाला."
...सेल्फी वगैरे झाल्यावर निरोप घेताना पोरांनी हात पुढे केले. म्हन्ले "सर, ऑटोग्राफ द्या.".. म्हन्लं, "हातावर?".. म्हन्ले, "मंग? आता सुट्टी नाय."... ऑटोग्राफ दिला.. म्हन्ले, "नाय, खाली 'विलास पाटील' लिहा.".. लिहून टाकलं.. त्याशिवाय 'सुट्टी' मिळालीच नसती मला. 😊
View this post on Instagram
हे सुरू असताना कुनीतरी व्हिडीओ काढला. आनि आज कुठनंतरी नंबर मिळवून मला व्हिडीओ पाठवला. म्हन्लं, "नंबर कुनी दिला???".. म्हन्ले "सातार्यात तुमचा नंबर मिळवनं आवघड हाय व्हय? मिळवला.. सुट्टी नाय..!"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.