मी 'या' अटीवरच लग्न करेन - मुक्ता बर्वे

मी 'या' अटीवरच लग्न करेन - मुक्ता बर्वे

मुक्ता म्हणते, विवाहसंस्था ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. पण मला इतकं कोणी आवडलंय, असं झालं नाही.

  • Share this:

मुंबई, 5 डिसेंबर : येत्या शुक्रवारी 'मुंबई पुणे मुंबई 3' सिनेमा रिलीज होतोय. पहिले दोन सिनेमे कमालीचे हिट झाले होते. आता याचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय. त्यानिमित्तानं आम्ही मुक्ता आणि स्वप्नीलशी संवाद साधला.

त्यावेळी बोलताना स्वप्नील म्हणाला, 'यावेळचे गौतम-गौरी बदललेत. आपण माणूस म्हणून नेहमीच बदलत असतो. एक गोष्ट तशीच राहिलीय, म्हणजे दोघांना स्वत:च्या शहराबद्दलचा अभिमान. मुंबई आणि पुणे. दोघंही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेत.त्यामुळेच त्यांच्यात बदल झालेत.'

मुक्ता म्हणाली, ' गौरीनं गौतमला होकार द्यायला बराच वेळ लावला. पण आता त्या दोघांना बाळ होणार आहे. त्यांच्या या प्रवासाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. मी, स्वप्नील आणि सतीश यांचाही हा 8-9 वर्षांचा प्रवास आहे.'

प्रेम, लग्न याभोवती फिरणारा हा सिनेमा करताना स्वत: मुक्ता आणि स्वप्नील विवाहसंस्थेकडे कसे पाहतात?

यावर मुक्ता म्हणाली, 'मी स्वत: लग्न केलेलं नाही. अजून तरी. पण आता मी जितकी आनंदात आहे, सुखात आहे, त्याच्यापेक्षा माझा आनंद, सुख वाढणार असेल तर मी नक्कीच जोडीदाराचा विचार करेन. विवाहसंस्था ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. पण मला इतकं कोणी आवडलंय, असं झालं नाही. तसं झालं तर मी लग्नाचा विचार करेन. स्वप्नील म्हणतो तसं, मनातलं व्हायोलीन वाजलं पाहिजे. माझं अजून वाजलं नाही. वाजलं तर वाजलं, नाही तर नाही.'

यावर स्वप्नील म्हणाला, 'लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. आता सगळ्यांची झाली, तू कधी करणार या प्रेशरखाली मुलांनी किंवा मुलींनी लग्न करू नका. लग्न हे गोड नातं आहे. नैसर्गिक आहे. तसंच होऊ द्या.'

स्वत:बद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, ' माझी बायको लीना लाखमोलाची आहे. ती माझ्यापेक्षा चांगली आहे. ती मला माझ्या परिवाराला आनंद देते. तुम्हाला तुमची 'गौरी' सापडली की लग्न करा. वय वाढलं म्हणून लग्न करायला हवं असं करू नका.'

शुक्रवारी रिलीज होणाऱ्या मुंबई पुणे मुंबई3मध्ये गौरी-गौतमच्या संसाराचे सर्व जण साक्षीदार होणार आहेत.

Video : आर्चीचं बदललेलं रूप तुम्ही पाहिलंत का?

First Published: Dec 5, 2018 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading