Wedding Cha Shinema Movie Review- वनटेकमध्येच ओके होणारा 'वेडिंगचा शिनेमा'

भाऊ कदम, संकर्षण कऱ्हाडे आणि प्राजक्ता हणमगर यांनी त्यांच्या भूमिका अगदी चपखल निभावल्या आहेत. सिनेमा संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही या तिघांच्या व्यक्तिरेखा कायम लक्षात राहतात.

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 03:32 PM IST

Movie: Wedding Cha Shinema
Rating: 3
Actor: Mukta Barve, Bhau Kadam, Shivraj Vaychal, Rucha Inamdar
Director: Dr Saleel Kulkarni

Wedding Cha Shinema Movie Review- वनटेकमध्येच ओके होणारा 'वेडिंगचा शिनेमा'

मुंबई, ११ एप्रिल- बायोपिक, ऐतिहासिक, विनोदी, वैचारिक सस्पेन्स सिनेमांच्या भाऊ गर्दीत अनेकांना हलका फुलका सिनेमा पाहण्याची हौस असते. म्हणजे त्यात विनोद असावा पण त्याचा उगाचच भडीमार असू नये. तसंच सिनेमातून एखादा मेसेज जरी द्यायचा असेल तर तो जड पद्धतीने देऊ नये अशी माफक अपेक्षा प्रेक्षकांची असते. पण त्यांची ही अपेक्षाही काही सिनेमे पूर्ण करत नाहीत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात डोईजड होणारे सिनेमे पाहण्यापेक्षा हलके फुलके.. मनाला आनंद देणारे सिनेमे पाहण्याला अनेकजण प्राधान्य देतात. असाच एक चांगला पर्याय मराठी सिनेमामध्ये डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिला आहे तो म्हणजे 'वेडिंगचा शिनेमा..'

मूळची पुण्याची असलेली पण फिल्ममेकर होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईत आलेल्या ऊर्वीची (मुक्ता बर्वे) ही कथा आहे. उर्वीला इतरांपेक्षा काही तरी वेगळं करायचं असतं. पण हे वेगळं नक्की कसं करायचं याच्याच शोधात ती असते. दरम्यान, पैशांसाठी ती एक प्री- वेडिंगचं प्रोजेक्ट घेते. अफेअर, लग्न, नाती या सगळ्या वायफळ आणि वेळ खाऊ गोष्टी आहेत यावर उर्वीचा ठाम विश्वास असतो.

पण पैशांसाठी ती हा प्रोजेक्ट करायला तयार होते. मुंबईची मुलगी आणि सासवडचा मुलगा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले असतात. पण दरम्यान, लग्नाला अवघे काही दिवस उरलेले असताना दोघांमध्ये काही कारणांमुळे मतभेद होतात आणि तिथून सिनेमाची कथा पुढे सरकते.

संपूर्ण सिनेमात अनेक हलके फुलके क्षण आहेत जे पाहताना तुम्हाला आपसूक हसू येते. विशेषतः भाऊ कदम, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता हणमगर यांनी त्यांच्या भूमिका अगदी चपखल निभावल्या आहेत. सिनेमा संपेपर्यंत आणि संपल्यानंतरही या तिघांच्या व्यक्तिरेखा कायम लक्षात राहतात. भूमिकेची लांबी न पाहताही छोटेखानी भूमिकेत आपला ठसा कसा उमटवायचा हे या तिघांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

Loading...

याशिवाय शिवराज वायचळ, ऋचा इनामदार शिवाजी साटम, अलका कुबल आठल्ये, अश्विनी काळसेकर, सुनील बर्वे, प्रवीण विठ्ठल तरडे प्रत्येकानेच आपलं काम चोख निभावल्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा पाहताना त्यांच्या घरातलाच एक वाटून जातो. दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असला तरी त्यांनी संपूर्ण सिनेमा आपल्या खाांद्यावर समर्थपणे वाहून नेला असेच म्हणावे लागेल.

असं असतानाही अनेक ठिकाणी इतर कलाकारांना न जमणारा अभिनय सतत डोळ्यात खुपतो. तसेच कॅमिओसाठी किंवा एखाद दोन वाक्यांसाठी घेतलेल्या त्या कलाकारांशिवाय दुसरा पर्याय नव्हता का हा प्रश्नही मनात उपस्थित होतो. तगड्या कलाकारांसमोर त्यांचं ते वागणं बोलणं अधिक डोळ्यांना खटकतं. सिनेमातली गाणीही फार लक्षवेधी नाहीत.

त्याउलट सिनेमात ती गाणी नसती तरी मूळ सिनेमाच्या कथेत फारसा फरक पडला नसता असं वाटतं. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी संकलन अजून चांगलं करता आलं असतं.पण सिनेमाच्या कथेमुळे आणि कलाकारांच्या अभिनयाकडे याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा आपण आपल्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स कसे तयार करतो आणि त्यात नकळतपणे गुंतत जातो याची जाणीव करून देणारा हा सिनेमा आहे. खूप दिवसांनी मनापासून खळखळून हसायचं असेल तर एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

- मधुरा नेरुरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...