Money Heist मधील 'इन्स्पेक्टर रकेल'च्या तोंडी सलमानचं ‘चुनरी चुनरी’ गाणं; पाहा भन्नाट VIDEO
Money Heist मधल्या स्पॅनिश अभिनेत्रीच्या तोंडून सलमानचं 'चुनरी चुनरी' गाणं ऐकायला मजा येईल ना? News 18 च्या एका मुलाखतीमध्ये इन्स्पेक्टर रकेलची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा हिंदी चित्रपटातील गाणं म्हणातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई, 17 नोव्हेंबर: बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच त्यातल्या गाण्यांनी संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. जगभरातील कलाकारही भारतीय गाण्यांच्या प्रेमात आहेत. आता Money Heist वेब सीरिजमध्ये इन्स्पेक्टर रकेलचंच उदाहरण घ्या ना. रकेलचं काम करणारी अभिनेत्री इत्झियार इट्युनोने (Itziar Ituño) चक्क सलमानचं चुनरी चुनरी गाणं म्हटलं आहे. नेटफ्लिक्सवरील मनी हाइस्ट या स्पॅनिश वेब सीरिजने आपल्याला Bella Ciao या गाण्याचं वेड लावलं. पण एक स्पॅनिश अभिनेत्री चक्क भारतीय गाण्यांच्या प्रेमात आहे. इत्झियारने गायलेल्या चुनरी चुनरी गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आकर्षणाचा विषय ठरला आहे.
न्यूज 18’च्या ‘शोशा’ या कार्यक्रमात या अभिनेत्रीने सलमान खान आणि सुश्मिता सेन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं गात सर्वांची मनं जिंकली. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या ऑनालाइन मुलाखतीत तिने आपल्याला बॉलिवूड डान्स आवडत असल्याचंदेखील म्हटलं आहे.
Petition to change Lisbon's name to whichever city Biwi No. 1 is set in! https://t.co/vzXIsyunme
सीरिजमधील भारताशी कनेक्शन असणारी ही पहिलीच अभिनेत्री नाही. नेटफ्लिक्सच्या या वेब-सिरीजमध्ये हॅकर्सची भूमिका साकारणारा स्पॅनिश अभिनेता मिगुएल हेरन यांच्याविषयी देखील नवीन माहिती समोर आली आहे.त्याने 2015 मध्ये एका भारतीय जाहिरातीमध्ये काम केलं होतं. गाना डॉट कॉमच्या या जाहिरातीमध्ये मिगुएलसह पिया बाजपेयीने सुद्धा अभिनय केला होता. या जाहिरातीमध्ये हे दोघेही मेट्रोमध्ये प्रवास करताना दाखवले गेले होते. यामध्ये संगीतामुळे त्यांच्यात कशी मैत्री झाली हे दाखवण्यात आलं होतं. 8 मिनिटे आणि 20 सेकंदाच्या या व्हिडिओत दिल्ली मेट्रोमध्ये या दोघांची भेट झाल्यानंतर दोघे अनोळखी असतानाही संगीतामुळे एकमेकांचे चांगले मित्र झाल्याचे दाखवण्यात आले होते. उत्तम म्युझिक आणि ट्यून्समुळे हा शॉर्ट व्हिडीओ लोकप्रिय झाला होता.
मनी हाईस्ट सीरिजमधील नैरोबी हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. नैरोबी म्हणजे अल्बा फ्लोरेस या अभिनेत्रीचाही भारतीय भाषेशी संबंध आला आहे. अल्बा फ्लोरेस यांनी स्पॅनिश चित्रपटात तेलुगू व्यक्तीची छोटीशी भूमिका केली होती. व्हिसेन्ट फेरर नावाचा स्पॅनिश चित्रपट जेसुइट मिशनरीच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित होता. हा पाद्री मूळचा स्पेनचा आहे. तो आंध्र प्रदेशला भेट देतो आणि तेथील लोकांचं जीवन सुधारण्यासाठी तिथेच रहायचं ठरवतो असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं त्यात अल्बाने तेलुगू व्यक्तीची भूमिका केली होती.