Home /News /entertainment /

'त्या' कारच्या पाठलागाने 'Miss Kerala'चा अपघाती मृत्यू; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

'त्या' कारच्या पाठलागाने 'Miss Kerala'चा अपघाती मृत्यू; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

केरळमधल्या कोचीमध्ये 1 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या एका भीषण अपघातामध्ये मिस केरळ 2019 (Miss Kerala Accident) स्पर्धेची विजेती अन्सी कबीर (Miss Kerala Ansi Kabeer) आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी अंजना शाजान (Anjana Shajan) या दोघींचा मृत्यू झाला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 डिसेंबर-  केरळमधल्या कोचीमध्ये 1 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या एका भीषण अपघातामध्ये मिस केरळ 2019 (Miss Kerala Accident) स्पर्धेची विजेती अन्सी कबीर   (Miss Kerala Ansi Kabeer)   आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी अंजना शाजान   (Anjana Shajan)   या दोघींचा मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत केरळ पोलीस तपास करत होते. एक महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी या अपघाताचं कारण शोधून काढलं आहे. संशयित ड्रग्ज तस्कर सैजू थंकाचननं एका आलिशान कारमधून या दोन्ही सौंदर्यवतींच्या कारचा पाठलाग केल्यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती कोचीचे पोलीस आयुक्त (Kochi police commissioner) सी. एच. नागराजू  (CH Nagaraju)  यांनी मंगळवारी (30 नोव्हेंबर) दिली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून थंकाचनला यापूर्वीच अटक केलेली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. एका मोटारसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं दिसून आलं होतं. या अपघातामध्ये अन्सी कबीर आणि अंजना शाजान यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांचा जाहिरात व्यावसायिक मित्र एम आसिक उपचारांदरम्यान मरण पावला होता. त्यांचा ड्रायव्हर रहमान यानं सीट बेल्ट घातल्यानं सुदैवानं तो बचावला होता.या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ड्रग्ज तस्कर सैजू थंकाचन याला ताब्यात घेतलं होतं. मद्यधुंद अवस्थेत (Drunk) असलेल्या त्यांच्या ड्रायव्हरला रोखण्यासाठी आपण दोन्ही तरुणींच्या कारचा पाठलाग केल्याचं तपासादरम्यान थंकाचननं पोलिसांना सांगितलं होतं; मात्र जखमी ड्रायव्हर रहमान यानं थंकाचनचा दावा फेटाळून लावला आहे. आरोपीनं कुंदनूर जंक्शनजवळ त्यांची कार अडवली होती आणि आपल्याला हॉटेलमध्ये परत जाण्याची धमकीही दिली होती, असा जबाब ड्रायव्हरनं पोलिसांना दिला आहे. एका विशेष तपास पथकानं (special investigation team ) मंगळवारी न्यायालयात या प्रकरणी अहवाल सादर केला आहे. अपघाताच्या रात्री झालेल्या एका पार्टीमध्ये आरोपीनं अन्सी आणि तिच्या मैत्रिणीसोबत वाद घातला होता. त्यानंतर त्यानं दोघींच्या गाडीचा वेगात पाठलाग केला. त्यामुळं त्यांनाही आपल्या गाडीचा वेग वाढवावा लागला होता. त्यांचा पाठलाग झाला नसता तर गाडीतल्या तिन्ही व्यक्ती जिवंत राहिल्या असता, असं पोलिसांच्या तपास अहवालात म्हटलं आहे. अहवाल सादर झाल्यानंतर न्यायालयानं थंकाचनचा (Thankachan’s ) जामीन अर्ज (bail plea) फेटाळून लावला असून, त्याच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. 'थंकाचन एक ड्रग अॅडिक्ट असून फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पार्टीनंतर त्यानं अनेक तरुणींची छेड काढल्याची माहिती आमच्याकडे आहे. तरुणींनी तक्रारी दिल्या तर आम्ही त्याच्यावर आणखी आरोप दाखल करू शकतो. सध्या त्याच्याविरुद्ध धमकावणं (कलम 506) आणि सदोष मनुष्यवध (कलम 299) आणि इतर कलमांनुसार (आयपीसी) दोन गुन्हे दाखल केले आहेत,' असं कोचीचे पोलीस आयुक्त म्हणाले. त्यापूर्वी अन्सी कबीरच्या काकांनी मंगळवारी आयुक्तांची भेट घेऊन थंकाचन यांच्याविरोधात नवीन तक्रार दाखल केली आहे. (हे वाचा:Sidharth Shuklaच्या मृत्यूच्या 3 महिन्यानंतर यांच्यासोबत वेळ घालवतेय शेहनाज गिल ) या प्रकरणाशिवाय, थंकाचन हा शहरातल्या पार्टीजमध्ये ड्रग्जचा पुरवठा (Drug supply) करणारा म्होरक्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अशा पार्टीजच्या माध्यमातूनच त्यानं अनेक महिलांना ब्लॅकमेल (Blackmail) केलं असावं, असाही संशय आहे. अपघात झाल्यानंतर हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना पार्टी एरियाची (Party Area) स्टोरेज डिस्क मिळाली होती. परंतु नंतर मालकाच्या निर्देशानुसार त्यांनी ती बॅकवॉटरमध्ये फेकली. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालक आणि त्याच्या पाच कर्मचाऱ्यांनाही १६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. दोन दिवसांनी त्यांना जामीन देण्यात आला होता. दोन दिवस बॅकवॉटरमध्ये शोध घेऊनही डिस्क मिळाली नव्हती. त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये अन्सी कबीर आणि शाजान पार्टीसाठी गेल्या होत्या तेथील रॉय जोसेफ, त्यांचे कर्मचारी आणि थंकाचन यांची आता एकत्रित चौकशी करण्याचा विचार पोलीस करत आहेत. केरळचे पोलीस महासंचालक अनिल कांत यांनी कोची आयुक्तांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते.
    First published:

    Tags: Entertainment, Kerala

    पुढील बातम्या