मुंबई, 26 नोव्हेंबर- 'मी होणार सुपरस्टार' (Mi Honar Superstar) या मराठी डान्स रिऍलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच शूट झाला. यावेळी सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि सुप्रिया यांसारख्या दिग्ग्ज जोड्या उपस्थित होत्या. दरम्यान नेहा मेठे (Neha Methe) या स्पर्धकाच्या आईला निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या हस्ते एक सुंदर मंगळसूत्र भेट म्हणून देण्यात आलं. मात्र या मंगळूसुत्रामागे एक फारच भावुक गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत.
स्टार प्रवाहवर ''मी होणार सुपरस्टार' हा डान्स शो आपल्या भेटीला येतो. लवकरच या शोचा महाअंतिम सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाची आपलं एक खाजगी आयुष्य होतं, जे या मंचावर उलघडलं. अशीच एक स्पर्धक म्हणजे नेहा मेठे होय. कोरोना काळात आर्थिक चणचणीचा सामना प्रत्येकालाच करावा लागला. त्यापैकीच एक होतं मी होणार सुपरस्टारची स्पर्धक नेहा मेठे आणि तिचं कुटुंब. वडिल रिक्षाचालक. कोरोनाच्या काळात वाहतूकीवर निर्बंध आला आणि नेहाच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं. त्याचकाळात वडिलांचं आजारपण आणि नेहाला स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं.
या दोन्ही गोष्टींसाठी हातात पैसे नव्हते. मात्र आपल्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभं रहाण्यासाठी नेहाच्या आईने आपलं मंगळसूत्र विकलं. दागिन्यापेक्षा मुलीच्या करिअरला महत्व देणाऱ्या नेहाच्या आईच्या या निर्णयाविषयी जेव्हा स्टार प्रवाह वाहिनीली कळलं तेव्हा त्यांनी नवं मंगळसूत्र पुन्हा नेहाच्या आईला द्यायचं ठरवलं. पु, न. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड यांच्या पुढाकाराने मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदित सराफ यांच्या हस्ते नेहाच्या आईला हे नवं मंगळसूत्र देण्यात आलं.
मुलांच्या कलागुणांना वाव देणारे पालक आहेत म्हणूनच असे नवे कलाकार घडत आहेत. अशी भावना अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. नेहाच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद खुप काही सांगत होता. मी होणार सुपरस्टारचा मंच या आनंदात न्हाऊन निघाला होता. हा भावनिक क्षण आपल्याला येत्या रविवार म्हणजेच 28 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment