भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी तसेच विविध भूमिकांनी 4 दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते, दिग्दर्शक मेहमूद अली यांची आज 88 वी जयंती. त्यांच्या काही गाजलेल्या सिनेमांबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. अभिनेते मेहमूद अली यांचा जन्म 29 सप्टेंबर 1930 मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडिल मुमताज अली हे 1940 ते 70 या दशकातील प्रसिद्ध स्टेज डान्सर आणि अभिनेते होते. मेहमूद यांनी 'किस्मत' या चित्रपटात बालकलाकार म्हणून अभिनय प्रवासाला सुरुवात केली. चार दशकांत 300 चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी साकारलेलं प्रत्येक पात्र आजही प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. प्रेक्षकांना हसवणाऱ्या या सदाबहार अभिनेत्याने 23 जुलै 2004 मध्ये 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पेनसिल्व्हेनियात त्यांचं निधन झालं.
हे आहेत त्यांचे गाजलेले चित्रपट
पडोसन (1968)
पडोसन या चित्रपटातील त्यांची साउथ इंडियन संगीत शिक्षकाची भूमिका प्रचंड गाजली आजही ही भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालते. मेहमूद यांनी केवळ अभिनेते म्हणून नाही तर दिग्दर्शक, निर्माते म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पडोसन या चित्रपटाचे ते सहनिर्माते होते. या चित्रपटात त्यांनी बिंदू अर्थात सायरा बानो यांच्या संगीत शिक्षकाची भूमिका केली होती. एक चतुर नार हे भारतीय सिनेमातील सर्वांत प्रसिद्ध गीत ठरले. आजही ते तेवढेच प्रचलित आहे. बिंदू हिचे प्रेम जिंकण्यासाठी सुनील दत्त आणि मेहमूद यांच्यातील जुगलबंदी आणि त्यांना संगीतमय साथ देणारे किशोर कुमार अशा चौघाांच्या अभिनयानी या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवलं. भोला - सुनील दत्त, विद्यापती - किशोर कुमार आणि मास्टरजी म्हणून मेहमूद अशा भूमिका त्यांनी साकारल्या.
भूत बंगला (1965)
दिग्दर्शक म्हणून एक हॉरर कॉमेडी बनवण्याचा त्यांचा विचार होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी 1965 मध्ये रंजन बोस यांच्या सोबत 'भूत बंगला' हा चित्रपट लिहिला. यात त्यांनी भूमिकाही साकारली आणि ते सहनिर्मातेही होते. तनुजा आणि नाझीर हुसेन यांनी भूमिका साकारल्या. एक विनोदी कलाकार म्हणून मेहमूद यांची ओळख निर्माण झाली. या चित्रपटात संगीतकार म्ह्णून त्यांनी एस. डी. बर्मन यांना संधी दिला त्यांचा हा त्यांचा पाहिला चित्रपट होता.
प्यार किये जा (1966)
एक रोमँटिक कॉमेडी म्हणजे प्यार किये जा हा चित्रपट. यात त्यांनी किशोर कुमार, शशी कपूर यांच्या सोबत अभिनय केला. ओमप्रकाश यांचे रामलाल हे पात्र गाजले. आपल्या विनोदाने मेहमूद यांनी वेगळी छाप पाडली. त्यांना या चित्रपटासाठी बेस्ट कॉमेडीयनचा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला.
बॉम्बे टू गोवा (1972)
मुंबईवरून गोव्याला निघालेल्या एका बसमधील घटनांवर आधारित चित्रपट.विविध पात्रांच्या अभिनयामुळे आणि गाण्यांमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. एका बस कंडक्टरची भूमिका मेहमूद यांनी साकारली यात अरुणा इराणी आणि अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटावरून मराठीत 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट बनवण्यात आला. एस. रामनाथन यांच दिग्दर्शन होतं.
गुमनाम (1965)
मोठ्या कलाकारांची फौज असलेला गुमनाम हा थ्रिलर प्रचंड गाजला. यातील "हम काले हो तो क्या हुआ" हे गाणं तुफान गाजलं. अनेक दशकं या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अगधा क्रिस्टी यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. मनोज कुमार, प्राण, नंदा, हेलन, मदन पुरी आणि मेहमूद अशी मोठी फळी यात होती. मेहमूद यांच्या अभिनयाने या चित्रपटात सर्वांची मने जिंकली.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.