ठाणे, 12 ऑक्टोबर: सध्या सामान्य माणूस 'महागाई' नावाच्या मोठ्या संकटाशी दोन हात करत आहे. सेलिब्रिटी देखील या संकटापासून वाचले नाही आहेत. पण सध्या याबाबत व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जात आहे. काही मजेशीर पोस्ट देखील या सेलिब्रिटींकडून शेअर केल्या जातात. अशीच एक पोस्ट मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक विजू माने (Viju Mane FB Post) यांनी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर ठाण्यात घडलेला किस्सा शेअर केला आहे. बिअर पिण्यासाठी न जाता लिंबू पाणी पिणं त्यांना कसं महाग पडलं हे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
विजू माने यांनी फेसबुकवर ही मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अभिनेता कुशल बद्रिकेसोबतचा एक फोटो आणि ज्याठिकाणी त्यांनी लिंबू सरबत प्यायले त्या रेस्टॉरंटचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये विजू माने यांनी म्हटलं आहे की, 'मी कुशलला म्हणालो, दुपारी उन्हाचे चटके लागत आहेत म्हणून मस्त बिअर मारुया. तो म्हणाला, नको त्यापेक्षा आपण लिंबू पाणी पिऊ. म्हणून आम्ही लिंबू पाणी प्यायलो. आणि लक्षात आलं त्यापेक्षा बिअर स्वस्त आहे आता उन्हाचे चटके मनाला लागत आहेत. ( हे गोव्यात नव्हे ठाण्यात आहे)...' 10 ऑक्टोबरला त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
विजू माने यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये हॉटेलचं बिल शेअर केलं आहे. त्यानुसार त्यांना साधं लिंबू सरबत 325 रुपयांना पडलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स देखील मजेशीर आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, 'लिंबू कलरची साडी देखील आली असती या बजेटमध्ये. #अशाहीबनवाबनवी #लिंबूसरबत'. तर काहींनी स्टेशनवर लिंबू सरबत पिण्याचा सल्ला दिला आहे. विजू माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.