Home /News /entertainment /

Uddhav Thackeray Resign: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर कलाकारांच्या प्रतिक्रिया, काहींचा पाठिंबा तर काहींनी केलं ट्रोल

Uddhav Thackeray Resign: मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर कलाकारांच्या प्रतिक्रिया, काहींचा पाठिंबा तर काहींनी केलं ट्रोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राजीनामा दिल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनीही आपल्या भावना आणि मत व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. काही कलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यात तर काहींनी टीका केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जून: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला (Uddhav Thackeray Resign)  आणि राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनामान्यानंतर राजकारण चांगलंच ढळवून निघालं असून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकीकडे भाजपकडून जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेसाठी हे मोठं आव्हान ठरलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियाद्वारे अनेकजण व्यक्त होत आहेत. अनेक मराठी कलाकारांनीही आपल्या  भावना व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. काही कलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यात तर काहींनी टीका केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे, किरण माने, पराग कान्हेरे, अरोह वेलणकर,  आस्ताद काळे, हेमंत ढोमे यासारख्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्यात. काय म्हणालेत ते जाणून घ्या. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची राजीनामा दिल्यानं अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचंही मोठ नुकसान झालं आहे. त्यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. त्या म्हणाल्या, 'धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र कोरोनासारख्या कठीण काळातही जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिलं. तुमचे नेतृत्व धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी आणि संवादप्रिय होतं. जय महाराष्ट्र !' अभिनेते किरण माने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत असताता. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर किरण माने म्हणालेत 'मला आनंद याचा झालाय की तुमी आता लै लै लै भाग्यवान आहात. सहजासहजी कुनाला मिळनार नाय, आज एकाबी नेत्याकडं नसंल अशी एक गोष्ट तुमच्याकडं हाय... कुठली? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध - स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पन जे आहेत ते मनाच्या तळापास्नं 'तुमचे' आहेत. जितक्या नि:स्वार्थीपने तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकबी तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के 'प्यूअर' असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात !' वाचा किरण मानेंची संपूर्ण पोस्ट तर बिग बॉस फेम आरोह वेलणकरनं जुन्या वृत्तपत्राचा एक फोटो शेअर केला आहे. 'महाराष्ट्राची जनता जिंकली', 'जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं', असं म्हणत टिका केलीय. त्याचप्रमाणे बिग बॉस फेम अभिनेता आस्ताद काळेनही ट्विट करत मत व्यक्त करत, 'महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण.....', असं म्हटलं आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. झिम्मा सिनेमाचा दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेनं मात्र मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हेमंतनं म्हटलंय, 'धन्यावाद उद्धव ठाकरेजी! तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार!' महाराष्ट्राच्या घराघरा ओळखले जाणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांचं मत व्यक्त करत म्हटलंय,  'तिसरी घंटा झाली.. पडदा सरकला.. नाटक सुरू.. performance तोच!!!!', त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Eknath Shinde, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Uddhav thackeray

    पुढील बातम्या