मुंबई, ०५ एप्रिल- नावाजलेल्या मालिका आणि सिनेमात काम करून स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या सोबत झालेली कास्टिंग काऊचची घटना ह्युमन ऑफ बॉम्बेच्या इन्स्टा पेजवर शेअर केली. या पोस्टमध्ये श्रुतीने भली मोठी पोस्ट लिहून सिनेमाच्या ऑडिशनवेळी कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचं म्हटलं.
यावेळी श्रुती म्हणाली की, एका सिनेमात लीड रोल देण्याच्या बदल्यात तिला निर्मात्याने वन नाइट स्टँडची अट घातली होती. पण प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. श्रुतीनेही त्या निर्मात्याला जशास तसं उत्तर दिलं.
श्रुतीने या पोस्टमध्ये लिहिले की, एकदा एका निर्मात्याने मला एक मुख्य भूमिका देऊ केली. सुरुवातीला तो मला फार प्रोफेशनल वाटला. पण काही दिवसांनी त्याने वन नाइट स्टँड, सामंजस्य असे शब्द वापरायला सुरुवात केली.
श्रुतीच्या मते, ‘मला ही गोष्ट अशीच सोडून द्यायची नव्हती. ‘जर मी तुमच्यासोबत शय्यासोबत करावी अशी इच्छा आहे तर हिरोला तुम्ही कोणासोबत शय्यासोबत करायला सांगणार असा थेट प्रश्न श्रुतीने विचारला.’ श्रुतीचा हा प्रश्न ऐकून निर्मात्याला धक्का बसला.
श्रुती पुढे म्हणाली की, ‘मी इतरांना ही घटना सांगितली. यानंतर त्याला तो प्रोजेक्ट सोडायला सांगण्यात आलं. मला निर्भिड व्हायला फक्त १ मिनिट लागला. मी फक्त माझ्यासाठी उभी राहिली नाही, तर मी त्या महिलांसाठी उभी राहिले ज्यांना सहज जज केलं जातं.’
एवढंच बोलून श्रुती थांबली नाही. ती पुढे म्हणाली, ‘माझ्या कपड्यांवरून मी काय आहे हे कोणी ठरवू शकत नाही. माझं टॅलेंट, मेहनत, यश यावर मी कोण आहे हे कळतं. मला ठाम वाटतं की हीच योग्य वेळ आहे जेव्हा लोक या गोष्टीला समजतील.’
आपल्या या पोस्टमध्ये श्रुतीने पहिल्यांदा स्क्रीनवर बिकिनी घालण्याच्या अनुभवाबद्दल सांगितले. मराठे म्हणाली की, ‘करिअरच्या सुरुवातीला मला दाक्षिणात्य सिनेमांमध्ये बिकिनी घालायला सांगण्यात आलं. मी एकाक्षणाचाही विचार न करता हो म्हणाले. माझ्या मनात बिकिनी घालण्याबद्दल कोणताही विचार नव्हता. मला सिनेमात काम करायला मिळतंय हेच माझ्यासाठी तेव्हा महत्त्वाचं होतं. अनेक वर्षांनंतर जेव्हा मला मराठी मालिकांमध्ये प्रसिद्धी मिळाली, तेव्हा मला बिकिनी सीनसाठी ट्रोल करण्यात आलं. पण या सर्व गोष्टींची मी पर्वा केली नाही आणि आपलं काम करत राहिले.’
सध्या श्रुती मराठेची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रुतीचे चाहते या पोस्टसाठी तिचं भरभरून कौतुक करत आहेत. श्रुतीने मराठी मालिका आणि सिनेमांसोबतच तमिळ सिनेमांमध्येही काम केलं आहे. श्रुतीचं स्वतःचं असं वेगळं फॅन फॉलोविंग आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.
VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...