मुंबई, 26 मार्च- मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमांमधूनसुद्धा आपली छाप पाडली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. हा क्षण संपूर्ण सिनेसृष्टीसाठी आणि अशोक सराफ यांच्या कुटुंबासाठी भावुक करणारा होता. यानिमित्ताने त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
अभिनेत्री निवेदिता सराफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्या नेहमीच अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो तसेच काही जुन्या आठवणी शेअर करताना दिसतात. नुकतंच निवेदिता सराफ यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अभिनेता सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, उमेश कामत, श्रेयस तळपदे ही कलाकार मंडळी बसून अशोक सराफ यांना हा पुरस्कार देताना दिसत आहेत. “मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल”, असे कॅप्शन निवेदिता सराफ यांनी या फोटोला दिले आहे.
वाचा-लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवलं आयुष्य, सिनेसृष्टीत धक्कादायक प्रकार
झी मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ झी गौरव पुरस्कार सोहळ्यामधीलच आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधवच्या एका कृतीमुळे सर्वच भारावून गेलेले दिसून येत आहेत. अभिनेत्याच्या त्या परफॉर्मन्सने सर्वच भावुक होत, कलाकारांच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसत आहेत. याला कारण देखील तितकेच खास आहे.
View this post on Instagram
अशोक सराफ यांना इंडस्ट्रीत मामा म्हणून ओळखलं जातं. लहान-वयोवृद्ध सर्वच कलाकार त्यांना मामा म्हणूनच बोलावतात. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव मामांच्या गाण्यांवर आणि त्यांच्याच गेटअपमध्ये एक सुंदर परफॉर्मन्स सादर करतो. आणि परफॉर्मन्स होताच तो पळत अशोक सराफांजवळ जाऊन त्यांच्या पायात नतमस्तक होतो. या क्षणाने मामा भारावून जातात. आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागतात. दरम्यान यावेळी मामाच नव्हे तर सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अलका कुबलसह सर्वच कलाकारांचे डोळे पाणवतात सर्वच त्या क्षणात भारावून गेलेलं दिसले.
>
त्यांनतर सिद्धार्थ जाधव अशोक सराफ यांना सन्मानित करण्यासाठी मंचावर चलण्याची विनंती करतो. आणि यावेळी महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर अशोक सराफांना घेऊन व्यासपीठावर येतात. हा क्षण अतिशय भावनिक होता हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.