मुंबई, 27 मार्च : काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा अचानक मृत्यू झाला. त्या बातमीनं सर्वत्रच खळबळ उडाली होती. भाग्यश्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाणही होते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. तिच्या बहिणीचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे अद्याप समजू शकलं नाही. आता बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भाग्यश्री पुढे आली आहे. तिने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री भाग्यश्री मोटेने बहिणीचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं म्हटलं आहे. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलंय, हे समोर यायला हवं, अशी मागणी तिनं केली आहे. यासोबत तिच्या बहिणीसोबत मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं हे भाग्यश्रीनं आता मांडलं आहे.भाग्यश्री मोटेची बहिण मधू मार्कंडे तिच्या मैत्रिणीसोबत वाकडमध्ये केक बनवण्याचा व्यवसाय करत होती. पण तिला अचानक चक्कर आली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं असं तिच्यासोबत असलेल्या महिलेनं सांगितलं होतं. पण आता बहिणीच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाण असल्याने तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसेच बहिणीच्या मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं हा घटनाक्रम भाग्यश्रीने स्पष्ट केला आहे.
भाग्यश्रीने पोस्टमध्ये म्हटलंय कि, 'हेलो. हे कोणाला धमकवण्यासाठी किंवा कोणाचं लक्ष वेधण्यासाठी नाहीये. फक्त खरं काय ते सांगत आहे. १२ मार्च २०२३ रोजी रविवारी दुपारी दोन वाजता माझी बहीण केक बेस घेऊन केक वर्कशॉप घेण्यासाठी बाहेर पडली होती. तिच्यासोबत एक महिला होती, जिला ती फक्त ३-४ महिन्यांपूर्वीपासून ओळखत होती. आम्हाला माहिती आहे त्यानुसार ती पाच महिलांना घेऊन केक वर्कशॉप घेणार होती. पण आता ती महिला सांगत आहे की, त्या दोघी सहज रुम बघायला बाहेर पडल्या होत्या. त्यांना एका जागेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्या जागेच्या मालकाला कॉल केला. आणि त्या दोघीं तिथं गेल्या. तिथं गेल्यानंतर अर्धा तास त्यांचं बोलणं झालं. त्यानंतर माझ्या बहिणीला अचानक चक्कर आली आणि ती कोसळली. तिला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. पण तिथं त्यांना संशयास्पद वाटलं त्यामुळं त्यांनी तिला सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितलं. त्यानंतर तिला वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिचा एका तासापूर्वीच मृत झाल्याचं सांगण्यात आलं होतं.'
View this post on Instagram
तिने पुढे म्हटलं आहे कि, 'यावरून स्पष्ट पुरावे आहेत की, माझी बहीण ठरल्याप्रमाणं केक वर्कशॉप घेण्यासाठी निघाली होती. तिला त्याचा अॅडव्हान्सही मिळाला होता. तिच्या चेहऱ्यावर नखांनी ओरखडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हे सगळं झालं खूप संशयास्पद आहे. माझी बहीण ज्या ठिकाणी गेली, ती जागा कमी गर्दीची जागा होती. तिथं सीसीटीव्ही नव्हते. माझ्या बहिणीनं घर आणि एक ऑफिस भाड्यानं घेतलं होतं. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ती वर्कशॉप घेत होती.'
भाग्यश्रीने बहिणीला न्याय मिळण्यासाठी म्हटलं आहे कि, 'मला हेच समजत नाहीये की, इतक्या दिवसांनंतरही कोणतीही कारवाई का करण्यात आली नोहीये. अनेक स्पष्ट पुरावे आहेत. काही तरी चुकीची माहिती पसरवली जात आहे. मला पाठपुरावा करतेय, पण मला कुणीही उत्तर देत नाहीये.माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवा' असं भाग्यश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.