मुंबई, 26 मार्च- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची सुरत सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. या घटनेनंतर देशांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त केलं आहे. राजकीय नेत्यांप्रमाणे सेलेब्स देखील याप्रकरणावर आपलं मत व्यक्त करताना दिसत आहेत. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील राहुल गांधी यांचे नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. सध्या शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
शरद पोंक्षे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेकदा ते राजकीय परस्थितीवर भाष्य करताना दिसतात. शरद पोंक्षे नेहमीच काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दिसतात. राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रा करत देशभर फिरत होते तेव्हा शरद पोंक्षेंनी अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कोठडी दाखवत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली होती. आता देखील त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता पोंक्षे शैलीत राहुल गांधी यांना टोमणा मारला आहे. "कर्माची फळं भोगावीच लागतात." अशा पद्धतीने ट्विट करत शरद पोंक्षेंनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पोंक्षेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिला आहेत. यातील एकानं म्हटलं आहे की, अभिनेते यांनी राजकारणात न पडलेले बरे..तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, त्यांच्या बापाचे तुकडे झालेत या देशात... त्या समोर हि कसली फळ...तर आणखी एकानं म्हटलं आहे की,तो गांधी आहे त्याने माफी नाही मागितली. कोर्ट देइल ती शिक्षा मान्य आहे पण मी माफी मागणार नाही.ते गांधी च रक्त आहे. माफीवीर नाही....... अशा असंख्य कमेंट राहुल गांधी यांच्या समर्थनात आल्या आहेत.
वाचा-तू तेव्हा तशी मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा कायमचाच निरोप; अभिनेत्री झाली भावुक
काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसंच पंतप्रधान मोदींवरही टीका केली. राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेवेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्याला भाजपने ओबीसींचा अपमान असल्याचं म्हटलंय. यावर तुमचे काय म्हणणे आहे. पत्रकाराच्या या प्रश्नानंतर राहुल गांधी भडकले आणि त्यांनी म्हटलं की, भाजपसाठी इतकं थेट काम का करताय? प्रश्न थोडा फिरवून विचारा. इतकं दबावाखाली काम करू नका. हवा निघाली का?
राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेतलं माझं कोणतंही भाषण घ्या. मी नेहमीच म्हटलं आहे की सर्व समाज एक आहे. द्वेष, हिंसा होऊ नये. हा ओबीसींचा मुद्दा नाही. भाजप मुख्य मुद्द्यापासून लक्ष वळवण्याचं काम करतेय. कधी ओबीसीवर बोलतील, कधी परदेशातल्या गोष्टी सांगतील असंही राहुल गांधींनी म्हटलं.
>
पत्रकाराच्या प्रश्नानंतर राहुल गांधी म्हटलं की, पत्रकार असल्याचं नाटक करू नका? चांगले प्रश्न का विचारत नाही आहात? हे स्पष्ट दिसतंय की भाजपसाठी काम करताय. प्रश्न थोडा फिरवून का नाही विचारत असंही राहुल गांधींनी विचारले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.