मुंबई, 10 डिसेंबर: हिरकणी (Hirkani) या ऐतिहासिक चित्रपटानंतर अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाबाबत रसिकांना उत्सुकता होती, मात्र ‘कोविड 19’च्या साथीमुळे काम रेंगाळलं. अखेर नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शूटिंगला सुरुवात झाली. आता दुसऱ्या टप्प्यातील शूटिंगची तयारीही सुरू आहे. पण अजूनही या चित्रपटातील चंद्रमुखी कोण, हे रहस्य उलगडलं नव्हतं. चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतच रिलीज झालं, तरीही हे गूढ उलगडलं नव्हतं. त्यातही चंद्रमुखीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळं ही उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. आता मात्र या रहस्यावरचा पडदा उघडला आहे. या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहे अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). ही अभिनेत्री नृत्यकलेत पारंगत असून, उत्तम डान्सर आणि अभिनेत्री म्हणून ती प्रसिद्ध आहे.
"तो ध्येयधुरंधर राजकारणी
ती तमाशातली शुक्राची चांदणी
लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची
ही राजकीय रशीली कहाणी...!!" अशा ओळी लिहित प्रसाद ओकनं ट्विटरवर या चित्रपटाची घोषणा केली होती.दिग्दर्शित केलेल्या ‘हिरकणी’ या शिवकालीन ऐतिहासिक चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, तर त्याच्या कच्चा लिंबू या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकत तो ‘चंद्रमुखी’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे.
लेखक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. विश्वास पाटील मराठीतील एक प्रतिभावान लेखक असून त्यांच्या संभाजी, पानिपत आणि महानायक या कादंबऱ्या मराठी साहित्य विश्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. झाडाझडती या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. अशा सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून साकारलेल्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीत राजकारण आणि तमाशा यांची उत्तम सांगड घातली असून, अतिशय चित्तवेधक अशी ही कादंबरी आहे. लावणी कलाकार असलेल्या चंद्रमुखीच्या आयुष्याची कथा यात मांडली आहे. चंद्रमुखीच्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित घटना घडतात की तिचं सगळं आयुष्यच बदलून जातं.
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स आणि अक्षय बर्दापूरकर (Akshay Baradapurkar) हा चित्रपट निर्माण करत असून, संगीतकार अजय-अतुल (Ajay-Atul) यांचं संगीत आहे, तर पटकथा अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकरनं लिहिली आहे. मराठीत अनेक वर्षांनी असा राजकीय तमाशापट येत असून, हा एक बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळं सर्वांनाच येणाऱ्या नवीन वर्षात एक भव्य दिव्य उत्तम मराठी चित्रपट पहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.