प्रवीण तरडेने (Pravin Tarde) त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा हा दिग्दर्शक पहिल्यांदाच लव्ह स्टोरी साकारणार आहे.
मुंबई, 29 नोव्हेंबर: शेतकऱ्यांच्या व्यथा, सत्यघटनांवर आधारित कलाकृती सादर करणारा मराठीतला गुणी दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. पण यावेळी प्रवीण तरडे (Pravin Tarde) त्याने कधीही न हाताळलेला विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवीण तरडेच्या आगामी सिनेमाचं नाव आहे, ‘कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल.’ ही एक लव्हस्टोरी आहे. नुकतीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रवीण तरडेचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाचा हिंदी रिमेक खुद्द सलमान खान करणार असल्याच्या चर्चा आहेत.
प्रवीण तरडे सध्या ‘सर सेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रवीण तरडेने आपल्या चित्रपटाबद्दल माहिती देताना सांगितलं, “मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये एक लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. परंतु प्रेमकथा एखाद्या सामान्य प्रेमकथेसारखी नाही माझे चित्रपट शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत किंवा सामाजिक विषयांवर प्रकाश टाकतात; प्रेमकथेतही हे मुद्दे असतील. माझ्या नव्या चित्रपटाचे नाव कोल्हापूर ते बुलढाणा व्हाया इस्त्राईल आहे.”
कोल्हापूर ते बुलडाणा व्हाया इस्त्राईल या चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना प्रवीण सांगतो की, ‘इस्त्राईलमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही तरीही त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्र याच विषयाचा अभ्यास करताना दिसतील आणि त्यातून एक छानशी प्रेमकथाही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’ प्रवीण तरडेच्या नव्या चित्रपटामध्ये नवोदित कलाकारांना संधी मिळणार आहे. प्रवीणचे चाहते त्याच्या नव्या सिनेमाबद्दल उत्सुक आहेत.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.