मुंबई, 16 डिसेंबर : 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून घराघरांत पोहचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेयने आपल्या अभिनय कौशल्याने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी अशी छाप उमटवली आहे. तो नेहमीच त्याच्या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांची मनं जिंकतो. अमेय वाघ सध्या एकदम सुसाट वेगात त्याचे नवनवे प्रोजेक्ट्स घेऊन आपल्या समोर येत आहे. तो लवकरच बॉलिवूडवर छाप सोडण्यासाठीही सज्ज झालाय. सध्या अमेयची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या पोस्टवर अभिनेता विकी कौशल आणि कियारा अडवाणीनी केलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अमेय वाघ ‘गोविंदा नाम मेरा’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अभिनेत्रीय कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर अशी स्टार कास्ट आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमेय रिक्षामध्ये बसला असून त्याच्यासोबत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणी देखील आहे. या फोटोसोबत अमेयने लिहिलं की, गोविंदा, गोविंदा की गर्लफ्रेंड आणि गोविंदाचा मित्र!
View this post on Instagram
अमेयने ही पोस्ट शेअर करताच काही क्षणातच ही व्हायरल झाली. पोस्टवर मराठी आणि हिंदी कलाकारांच्या भरभरुन कमेंट पहायला मिळाल्या. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये विशेष लक्ष वेधलं ते विकी आणि कियाराच्या कमेंटने. अमेयच्या पोस्टवर कमेंट करत विकी कौशल ने लिहिलं, लव यू ब्रो, तर कियारानं लिहिलं, एक मोठी मिठी कौस्तुभ. याशिवाय अभिज्ञा भावे, क्षितीज पटवर्धन, प्रियांका बर्वे, अशा अनेक कलाकारांच्याही कमेंट आल्या आहेत. सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली असून त्याचे चाहते त्याच्यावर आणि त्याच्या कामावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अमेय वाघ चांगलाच चर्चेत आहे. अमेय आणि विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 16 डिसेंबरला म्हणजेच आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला आणि अमेयच्या भूमिकेला किती प्रेम देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kiara advani, Marathi entertainment, Marathi news, Vicky kaushal