मुंबई, 11 नोव्हेंबर: बघतोय रिक्षावाला या गाण्याने महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील लोकांना आपल्या तालावर नाचायला लावणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी नाईक (Mansi Naik) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा पार पडला. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने ही बातमी दिली. प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.
प्रदीप खरेरा हा पेशाने बॉक्सर आहे. प्रदीप आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळतो. प्रदीपला अभिनय आणि नृत्यातही गती आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने प्रदीपसोबतच्या रिलेशनची माहिती दिली होती. प्रदीप आणि मानसी दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. प्रदीप आपल्या मॉडलिंगचे आणि बॉक्सिंगचे फोटो शेअर करत असतो.
मानसीने प्रदीपसोबत फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. Engaged Future Mrs. Kharera असं कॅप्शनही तिने दिलं आहे.सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे फक्त 6 लोकांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा पार पडला. यावेळी मानसीसोबत तिची सर्वात जवळची मैत्रीण दिपाली सय्यदही होती.‘कोरोनाच्या काळात सर्वांना साखरपुड्याला बोलावणं शक्य झालं नाही. प्रदीपचे कुटुंबीयदेखील हरियाणाला असतात. त्यांनादेखील येणं शक्य झालं नाही. पण आम्हाला सर्वांनी फोनवरुन आशीर्वाद दिले’ असं मानसी नाईकने सांगितलं. जानेवारीमध्ये त्यांचं लग्न होणार आहे.