मुंबई, 11 नोव्हेंबर: तुमच्या-आमच्या घरात ज्याप्रमाणे दिवाळीचा उत्साह आहे, तसाच मालिकांच्या सेटवरही सध्या उत्साहाचं वातावरण आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्येही दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. आदित्य (Virajas Kulkarni) आणि सई (Gautami Deshpande) यांचं वाढत जाणारं बॉडिंग गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी पाहिलं आहेच. पण आता ब्रह्मेंच्या घरची सून होण्याच्या दिशेने सईची पावलं पडत असतानाच कथेमध्ये एक ट्विस्ट येणार आहे.
दिवाळीत तर मोठी आतशबाजी होणार आहे. स्वयंपाकाचा जराही गंध नसलेली सई जेव्हा फराळ बनवण्याच्या निमित्ताने ब्रह्मेंकडे येईल तेव्हा फराळाबरोबरच ह्या घरची सून होण्यासाठी कुठल्या गुणांची गरज आहे हेही शिकेल. आप्पांकडून ह्या घरच्या सूनेसाठी ठेवलेल्या बांगड्या मिळवेल. पण आदर्श सूनेची परिक्षा सई पास होते आहे की काय असं वाटत असतानाच, दापोलीला गेलेला दादामामा आदित्यचं मेघनाशी लग्न ठरवून मोकळा होणार आहे म्हणे. आणि हा जबर धक्का सई आणि आदित्यच्या नात्याला बसणार आहे. ह्या धक्क्याने आदित्य आणि सईला एकमेकांमधे असलेल्या नात्याचा अर्थ आणि गांभीर्य समजणार का? मेघनाशी होणारं लग्न मोडून आदित्य सईवर प्रेम असल्याचं जाहीर करणार का? आणि ह्या साऱ्याचा दादामामा आणि एकूणच ब्रह्मे घरावर काय परिणाम होणार हे मात्र सांगण्यात येत्या काही भागांमध्येच पाहायला मिळणार आहे.
सई आदित्यचं प्रेम आता जाहीर होण्याच्या मार्गावर तर आहेच, पण त्या प्रेमासाठी जवळच्या माणसांविरूद्ध उभं राहण्यासाठी भाग पाडणारं आहे! तर दुसरीकडे सुयशही सईला इंप्रेस करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्या घरांत दिवाळी साजरी होत असतानाच ब्रह्मेंच्या घरातही दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. आदित्य, सईसोबत आदित्यचे मामाही फराळाचा आस्वाद घेत मस्तपैकी दिवाळी साजरी करणार आहेत.