मुंबई, 29 मार्च- मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. सिनेमात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग विविध ठिकणी सुरु आहे. दरम्यान पन्हाळ्यातील सज्जा कोटी याठिकाणी या सिनेमाचं शूटिंग सुरु असताना मोठा अपघात घडला होता. शूटिंगसाठी आलेला एक तरुण दरीत पडून जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णलयात उपचार सुरु होते. दरम्यान आता एक वाईट बातमी समोर आली आहे. तब्बल 10 दिवसांच्या उपचारानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वच सुन्न झाले आहेत.
महेश मांजरेकरांचा हा ऐतिहासिक सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमासाठी मोठी टीम कार्यरत आहे. सेटवरील विविध डिपार्टमेंटमध्ये शेकडो लोक काम करत आहेत. यामध्येच सेटवरील घोड्यांची देखभाल करण्यासाठी नागेश प्रशांत खोबरे या तरुणाची नेमणूक करण्यात आली होती. ऐतिहासिक पन्हाळ्यातील सज्जा कोठी याठिकाणी या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. दरम्यान गडावरील तटबंदीवरुन हा तरुण खाली दरीत कोसळला होता. यामध्ये त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरु होते. गेल्या 10 दिवसांत उपचार सुरु असूनदेखील त्याच्या प्रकृतीत फारसा फरक जाणवला नव्हता. दरम्यान आज पहाटे या तरुणाचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकाराने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधारात फोनवर बोलता बोलता हा तरुण दरीच्या अगदी जवळ गेला. आणि तटबंदीचा अचूक अंदाज न आल्याने तो दरीत खाली कोसळला. यामध्ये त्याला डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. यादरम्यान त्याला तात्काळ कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
जखमी तरुणाला चित्रपटाच्या व्यवस्थपणाकडून उपचाराचाखर्च देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र या दहा दिवसांच्या उपचारात एकावेळीही पैसे देण्यात आलेले नाहीत. उपचाराचा खर्च भागवल्याशिवाय आपण मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या तरुणाच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.