मुंबई,26 मार्च- 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो समजला जातो. या शोमधून मराठमोळे कलाकार आपल्या विनोदाने आणि अभिनयाने लोकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. या शोमधून अनेक कलाकारांना नवी ओळख मिळाली आहे. या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता-हास्यकलाकार प्रसाद खांडेकर होय. या शोच्या माध्यमातून प्रसाद खांडेकर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. दरम्यान अभिनेत्याने एका मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबाबत एक खुलासा करत सर्वांनाच चकित केलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये कलाकार जोडी-जोडीने पर्फोमन्स देताना दिसून येतात. या जोड्या सर्वांच्याच आवडत्या बनल्या आहेत. यातीलच लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव होय. या जोडीने नेहमीच लोकांना खळखळून हसवलं आहे. प्रसाद हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो एक उत्तम लेखकही आहे. सध्या तो आपल्या 'कुर्र्रर्र्र' या नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. तसेच आगामी काळात तो 'एकदा येऊन तर बघा..रिटर्न जाणारच नाही' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून भेटीला येणार आहे.
तत्पूर्वी प्रसादची एक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने आपल्या स्ट्रगलच्या काळाबद्दल खुलासा केला आहे. प्रत्येकवेळा सहजासहजी यश मिळतंच असं नाही. जवळजवळ सर्वच कलाकरांना लोकप्रियतेचा शिखर गाठण्यासाठी अनेक अपयश-अडचणींना तोंड द्यावं लागतं. असंच काहीसं प्रसादसोबत झालं आहे. त्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक अडचणींवर मात करावी लागली आहे.
View this post on Instagram
या मुलाखतीमध्ये प्रसादने सांगितलं की, 'माझ्या वडिलांना नाटकांचं मोठं आकर्षण होतं. त्यांना त्यांची फारच आवड होती. लहानपणी ते मला घेऊन जायचे. याच काळात मला अभिनय क्षेत्राची गोडी लागली होती. प्रसादने पुढे सांगितलं, 'खरं सांगायचं झालं तर, मी एक खेळाडू होतो. मला क्रिकेटची आवड होती. आणि शालेयकाळात क्रिकेटपटू म्हणून माझी जडणघडण सुरु होती. महत्वाचं म्हणजे प्रसादची मुंबईतून अंडर १४ मध्ये निवड झाली होती. परंतु एका अपघाताने सगळं काही बदललं. प्रसादने सांगितलं की, १० वी नंतर माझा गंभीर अपघात झाला होता. त्यामुळे क्रिकेट माझं क्रिकेट करिअर मध्येच थांबलं.
प्रसादने पुढे सांगितलं की, या अपघातानंतर तो तब्बल तिने महिने मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत होता. प्रसादने म्हटलं की, या अपघातानंतर तो क्रिकेट खेळू शकला नाही. पुढे तो आपली दुसरी आवड जोपासत कलाक्षेत्रात सक्रिय झाला. आणि आज प्रसादला दुसऱ्या कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो आज एक उत्तम हास्य-कलाकार आणि अभिनेता म्हणून मराठी माणसांच्या मनावर राज्य करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Maharashtrachi Hasyajatra, Marathi entertainment