गुरदासपुर, २३ एप्रिल- सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. यातच यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार राजकारणात आपलं नशीब पडताळून पाहण्यासाठी उतरले. आता या यादीत बॉलिवूडचा ‘ढाई किलो का हात’ अर्थात सनी देओलही उतरला आहे. सनीने नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सनी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी गुरदासपुर येथून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते विनोद खन्ना यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती.
सनी देओलने तीन दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हा पासून सनी भाजपमध्ये प्रवेश करणार असा कयास लगावला जात होता. याआधी सनीला अमृतसर येथून जागा दिली जाईल असे म्हटले जात होते मात्र गुरुदासपुरच्या जागेसाठी आता त्याचा विचार केला जात असल्याचं म्हटलं जात आहे.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल नुकतात भाजपच्या ऑफिसमध्ये गेला. लवकरच तो अधिकृतरित्या पक्षात प्रवेश करेल pic.twitter.com/VRo9lO6v5t
पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल मिळून यंदाची लोकसभा निवडणूक लढवत आहेत. इथल्या १३ जागांपैकी भाजपला गुरदासपुर, अमृतसर आणि होशियारपुर येथून तगडे उमेदवार उभे करायचे आहेत. तर उरलेल्या जागांवर अकाली दलचे उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. त्यामुळे भाजपच्या या तीन जागांवर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. भाजपने रविवारी अमृतसर येथून हरदीप पुरी यांच्या नावाची घोषणा केली. पण अजूनपर्यंत होशियारपुर आणि गुरदासपुर या जागांवर कोणते उमेदवार निवडणूक लढवणार याची घोषणा केली नाही.
२०१४ मध्ये गुरदासपुर येथूनच जिंकले होते विनोद खन्ना
विनोद खन्ना यांच्या निधनानंतर ही जागा अजूनही रिक्त आहे. गेल्या वर्षी २७ एप्रिलला विनोद खन्ना यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात विनोद यांची पत्नी कविता यांचं नावही या जागेसाठी सुचवण्यात आलं आहे. विनोद यांनी १९९७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. १९९८ मधअये गुरदासपुर येथून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. १९९९ आणि २००४ च्या निवडणुकांमध्येही विनोद यांनी आपली ही जागा कायम राखली होती. २००९ मध्ये मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र २०१४ च्या मोदी लाटेमुळे विनोद कन्ना याच जागेवर जिंकून येत खासदार झाले होते.
२०११ च्या जनगणनेनुसार गुरदासपुर जिल्हा हा पंजाबच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा घोषित करण्यात आला होता. या जिल्ह्याची लोकसंध्या २२ लाखांहून जास्त असून ७९ टक्के लोक साक्षर आहेत. या जिल्ह्याची स्थापना १७ व्या शतकात गुरियाजी यांनी केली होती. त्यांच्यामुळेच या जिल्ह्याचं नाव गुरदासपुर असं पडलं.