S M L

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं वयाच्या 102व्या वर्षी निधन

मराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणार्‍या यमुनाबाई वाईकर या बर्‍याच दिवसापासून आजारी होत्या.

Sonali Deshpande | Updated On: May 15, 2018 06:16 PM IST

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं वयाच्या 102व्या वर्षी निधन

सातारा,15 मे :  मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्‍या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या 102 व्या वर्षी वाई इथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले.

मराठी लोकसंस्कृतीचा एक धागा असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला उत्युच्च स्थानी नेऊन ठेवणार्‍या यमुनाबाई वाईकर या बर्‍याच दिवसापासून आजारी होत्या. त्यांच्यावर वाई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

यमुनाबाई यांचा जन्म 31 डिसेंबर 1915 रोजी वाई येथे झाला होता. घरातच त्यांना लावणी व तमाशाचे बाळकडू मिळाले होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी स्वत:चा तमाशा फड काढला होता. यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर अख्खा महाराष्ट्र गाजवला.

महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या. ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. त्यांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी अॅवार्ड व देशातील अतिशय मानाच्या समजल्या जाणार्‍या पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. सुमारे बावीस राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

मराठी तमाशा क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम यमुनाबाई वाईकर यांनी केलेले आहे. अशा या सातारच्या भूमीतील थोर लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Loading...
Loading...

त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांना आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2018 06:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close