चित्राली चोगले, प्रतिनिधी
'लपाछपीचा खेळ मांडला तू पण येना खेळायला...'तर हा 'लपाछपी'चा भय-सस्पेन्सचा खेळ रंगला आणि त्याची जादू तशी चालली सुद्धा...सिनेमा मुळातंच हॉरर असल्याचं माहीत असल्या कारणानं आपण आधीच थोडे घाबरलेले असतो आणि अंदाज तर बांधत असतोच की आता काहीतरी होणार तसंच या सिनेमाच्या बाबतीतही होतं. सिनेमाचं संगीत अगदी पहिल्या फ्रेमपासून उत्तम जमुन आलंय, त्यामुळे सिनेमाच्या कथेतले किंवा संपूर्ण सिनेमातल्या काही त्रुटींना ते भरुन काढतं.
काय आहे स्टोरी ?
नेहा-तुषारची ही गोष्ट अगदी सुरू होताच मुळ मद्याला हात घालते...कुठलाही फाफट पसारा न करता थेट सिनेमाला सुरुवात होते हे उत्तम...तरप हे जोडपं त्यांच्या कुठल्यातरी अडचणीपासून लांब पळण्यासाठी गावी त्यांच्या ड्रायव्हरकडे रहायला येतात आणि सिनेमाची कथा रंगू लागते. इथं आल्यापासूनंच विचित्र गोष्टी घडू लागतात आणि आपणही त्यात रमू लागतो. पण सिनेमाच कथा रंगू लागते ना लागते सिनेमात ब्लॅकआऊट येतात, अगदी मध्येच आणि त्याचसोबत आपण सिनेमापासून थोडे दुरावतो. पण मग सिनेमातलं भय अधिक वाढतं ज्यामुळे सिनेमाचा पेस थोडा वाढू लागतो. सिनेमातली सूडकथा, सस्पेन्स आणि भय एकाच ट्रॅकवर चालताना थोडा गोंधळ होतो पण ते चालायचंच.
परफाॅर्मन्स
सिनेमात फक्त 4 मुख्य पात्र आहेत पूजा सावंत, विक्रम गायकवाड, उषा नाईक आणि अनिल गवस. तर प्रत्येकानं आपलं काम चांगलं केलंय. पण विशेष ठरतं ते उषा नाईक यांचं काम. त्यांचा कसलेला अभिनय म्हणजे सिनेमाला लागलेले चार चांद.
पूजा नाईकचा अभिनय त्यामुळे थोडा फिका पडतो. त्यात पूजा 8 महिन्यांची गरोदर दाखवण्यात आलीये, पण तिच्या वावरण्यातून किंवा देहबोलीतून ते जाणवत नाही. पण कथा मुळात चांगली असल्यामुळे सिनेमा तग धरून राहतो आणि सिनेमातून आपण पूर्ण बाहेर येत नाही.
सिनेमातील भय-थरार अंगावर येतो, काही सीन्स तर थरकाप उडवतात देखील. पण तरी एक प्रश्न पडतो ते सिनेमातल्या भूतांबद्दल. एरव्ही भुतांना तमा नसतात आणि भूतं कुठेही कशीही येतात जातात हे आपण अनेकदा पाहिलंय पण मग या सिनेमात तसं होत नाही. या सिनेमातलं भूत येतं कसंही पण जाताना दरवाजा उघडून वगैरे जातं आणि त्यामुळे आपण थोडे गोंधळतो. बरं अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक खूप मोठा समज आहे किंवा गैरसमज म्हणूनयात की घाणेरडा चेहऱ्याचं भूत दाखवणं म्हणजे घाबरवणं. हे घाणेरडे किंवा विचित्र चेहरे या सिनेमात टाळले असते तरी चाललं असतं.
असो सिनेमा पाहताना भीती वाटते, सीन्स थरकाप उडवतात, सिनेमाने गहन विषयाला हात घातलाय ते ही उत्तम, विकाय फुरीयाने केलेलं सिनेमाचं दिग्दर्शन ही बरं झालंय पण अजून चांगलं होऊ शकलं असतं. सिनेमा पाहिल्यावर सिनेमाचा प्रभाव राहतो ते विशेष.
सिनेमा का पहावा ?
तर त्यातल्या संगीतासाठी, चांगल्या कथेसाठी, हॉरर निर्माण करणाऱ्या काही सीन्ससाठी आणि सिनेमातल्या ट्विस्टसाठी. याही पेक्षा अधिक उषा नाईक यांच्या अभिनयासाठी तर नक्कीच आवर्जुन पहावा. तर सिनेमाच्या चांगल्या गोष्टी असल्यातरी काही गोष्टी राहुन जातात आणि एक पण मनात येतो...
रेटिंग : अडीच स्टार्स
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा