मुंबई, 12 डिसेंबर: लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chadda) या सिनेमाचं शूट सध्या जोरदार सुरू आहे. गेल्या 30 वर्षांपासून सलमान खान (Salman Khan) आमिर खान (Aamir Khan) शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे तीन खान बॉलिवूडवर राज्य करत आहेत. तिघांमध्ये कधी वाद झाले, कधी वाद संपून मैत्रीही झाली. आता बॉलिवूडचे हे 3 सुपरस्टार्स एका सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. ही किमया साधली आहे, लाल सिंह चड्ढा या सिनेमाने.
सलमान खान लवकरच लाल सिंह चड्ढा या सिनेमाचं शूटिंग करणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, सलमानने आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून 1 दिवस लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगसाठी दिला आहे. सलमान खान खरंतर त्याच्या कामात अतिशय व्यस्त होता पण आमिर खानच्या आग्रहाला तो बळी पडला. सलमान अगदी छोट्याश्याच भूमिकेत या चित्रपटामध्ये दिसणार आहे. शाहरुख खानने या चित्रपटाचं शूटिंग आधीच केलं आहे. लाल सिंह चड्ढा सिनेमातला आमिर खानचा लूक अतिशय व्हायरल झाला आहे.
लाल सिंह चड्ढा या सिनेमामध्ये आमिर खानसोबत करीना कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच शूटिंगचं शेड्यूल संपवून ती मुंबईत परतली आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.