मुंबई, 29 मे : अभिनेता अर्जुन कपूरचा मागच्या आठवड्यात रिलीज झालेला सिनेमा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. पण या सिनेमापेक्षा आपल्या पर्सनल लाइफमुळे अभिनेता अर्जुन कपूर फार चर्चेत राहिला. पण या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अर्जुननं मलायकाशी असलेलं नातं सर्वांसमोर जाहीरपणे मान्य केलं. त्यामुळे अर्जुन-मलायकाच्या लग्नाच्या चर्चांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोर धरला आहे. पण अर्जुन आणि मलायकानं आपल्या लग्नाबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. पण अर्जुन बहीण अंशुला कपूरमुळे लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन कपूर बहीण अंशुला कपूर लग्न करण्याची वाट पाहत असून तिच्या नंतरच मलायका आणि अर्जुन लग्न करणार आहे. पण या सगळ्याबाबत अर्जुनला विचारलं असता तो म्हणाला, 'मी या अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मला वाटतं या सर्व गोष्टी आपोआप घडत जातात. जर अंशुलाला लग्न करायचं असेल तर मला आनंद आहे. पण जर ती म्हणत असेल की, तिला अजून काही वेळ हवा आहे. तरीही मला काहीही समस्या नाही. मी तिच्या कोणत्याही निर्णयात तिच्या सोबत आहे.'
अर्जुन पुढे म्हणाला, 'अंशुलाला लग्नावर विश्वास आहे आणि त्यामुळे मी सुद्धा त्यावर विश्वास ठेवतो. आम्ही आमच्या आयुष्यात असं काही पाहिलं आहे, ज्यानंतरही आम्हाला वाटतं की लग्न ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आधी तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. सध्या ती कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यासाठीच मी अद्याप तिच्याशी लग्नाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी तिच्याशी या विषयावर नक्की बोलेन'
अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर अगदी सुरुवातीपासूनच मोहर लावण्यात आली नव्हती. अनेकदा विचारूनही त्यांनी कित्येक महिने यावर बोलणं टाळलं होतं. एवढंच नाही तर करण जोहर, करिना कपूर, प्रियांका चोप्रा आणि जान्हवी कपूर यांनीही त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. पण तरीही कोणत्याच प्रश्नाचं मलायका आणि अर्जुनने कधीच उत्तर दिलं नाही. आता इंडियाज मोस्ट वाँटेड सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळ दोघांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला असून अधिकृतरित्या ते एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं आहे.