News18 Lokmat

पाहायला गेला ‘गेला उडत’ अन् बनला ‘रंगीला रायबा’

केदार शिंदेंनी आल्हादला फोनवरून व्हिडिओ बनवून ऑडिशन पाठवायला सांगितली. आल्हादसाठी सारं काही स्वप्नवतच होतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2017 05:38 PM IST

पाहायला गेला ‘गेला उडत’ अन् बनला ‘रंगीला रायबा’

06 नोव्हेंबर : सोलापूरचा एक युवक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नाटक पाहण्यासाठी पुण्याला जातो. अन् प्रेक्षक म्हणून आलेल्या एका तरूणाला चक्क दिग्दर्शक केदार शिंदेना यांच्याकडून ‘रंगीला रायबा’च्या लीड रोलसाठी ऑफर मिळते.आहे ना अचंबित करणारी गोष्ट?

गेला उडत' या नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. सोलापूरचा युवा नाट्यअभिनेता आल्हाद अंदोरे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सिद्धार्थ जाधव आणि अमीर तडवळकर यांची भूमिका असलेला 'गेला उडत' चा प्रयोग पाहण्यासाठी तो पुण्याला गेला होता. नाटक सुरू व्हायला थोडा वेळ असल्याने थिएटरमध्ये संकुलात मोबाईलवर फोटो-व्हिडिओ काढणं सुरू झालं. त्यातील काही फोटो आणि व्हिडिओ त्याने अमीर तडवळकर यांना टॅग करून फेसबुकवर अपलोड केले. अमीर तडवळकर यांची भेट घेऊन तो नाटक पाहायला बसला. संपूर्ण नाटक पाहून बाहेर पडतो तोच त्याला एक फोन आला. फोन अमीर तडवळकरचा होता. अमीरने त्याला तात्काळ नाटकाच्या गाडीजवळ बोलावलं. तो गेला, भेटला. अमीरने स्वत:च्या फोनवरून एक फोन लावला आणि आल्हादच्या हातात दिला आणि म्हणाला बोल. फोनवर समोरची व्यक्ती होती. दिग्दर्शक केदार शिंदे. तो शॉक!

फेसबुकवर टॅग केलेले फोटोज्-व्हिडिओ केदार शिंदेनी पाहिले आणि अमीर तडवळकरला कॉल करून आल्हादबद्दल माहिती घेतली. सोलापूरच्या एकाच नाट्यवलयातील असल्याने अमीर आल्हादला चांगला ओळखत होता. त्याने आल्हादच्या एकांकिका आणि नाटकातील कारकिर्दीबद्दल सांगितलं. केदार शिंदेंनी आल्हादला फोनवरून व्हिडिओ बनवून ऑडिशन पाठवायला सांगितली. आल्हादसाठी सारं काही स्वप्नवतच होतं.

वेगवेगळ्या शैलीत आल्हादने आपल्या अभिनयाचे व्हिडिओ शूट केले आणि अमीरच्या माध्यमातून केदार शिंदेना व्हॉट्स ॲपवर धाडले. मग काय! काही वेळाने आल्हादचा मोबाईल खणाणला... 'हॅलो... आल्हाद!  केदार शिंदे बोलतोय… लगेच बॅग पॅक करायची आणि मुंबई ला यायचं. तूच आहेस माझारंगीला रायबा. तुला लीड रोल देतोय. घरी सांग आता हीरो बनूनच सोलापूरला परतेन! आल्हादच्या पायाखालची जमीन सरकून तो हवेत उडाला होता.

Loading...

आल्हाद सोलापूरच्या कॉलेज रंगभूमीवरचा हिरो आणि व्यवसायाने अॅडव्होकेट! आतापर्यंत त्याने अनेक एकांकिका केल्या. त्यात ‘अस्वल’ आणि ‘दे धक्का’ या एकांकिका गाजल्या. ‘इस्केलॅवो’ आणि ‘हिल टॉप व्हीला’ या व्यावसायिक नाटकांनी त्याला ओळख मिळवून दिली. लहानपणापासून बालनाट्यात काम करणाऱ्या आल्हादचं सिनेमात हिरो बनण्याच स्वप्न ‘गेला उडत’ हे नाटक पाहून साकार झालंय.

केदार शिंदे दिग्दर्शित, श्री विजयसाई प्रॉडक्शन निर्मित रंगीला रायबा येत्या १० नोव्हेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...