मुंबई, 29 मार्च : 'महाराष्ट्र शाहीर' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येऊ घातला आहे. येत्या 28 एप्रिलला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राची लोककला जपणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित शाहीर साबळे हा मराठी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी सिनेमात शाहीर साबळे यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर समोर आला आहे. त्याचप्रमाणे बहरला हा मधुमास हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सिनेमातील या गाण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सिनेमातून महाराष्ट्राला आणि मराठी सिनेसृष्टीला सना शिंदे ही नवी अभिनेत्री मिळाली आहे. सना शिंदे म्हणजेच सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी. सनानं या आधी अगं बाई अरेच्चा या सिनेमात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. आता महाराष्ट्र शाहीर या सिनेमातून मोठी सना प्रेक्षकांसमोर येणार आहे. मुलगी सनाबरोबर काम करताना केदार शिंदे यांना मात्र दडपण आलं होतं. न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुसिव्ह गप्पा मारताना त्यांनी यामागचं कारण सांगितलं.
केदार शिंदे यांच्यासाठी महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा सर्वांगानं वेगळा आणि अत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे. आपल्या आजोबांची म्हणजे शाहीर साबळेंचं आयुष्य ते सिनेमातून रूपेरी पडद्यावर संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणार आहेत. सगळ्याच प्रकारे केदार शिंदे यांनी सिनेमसाठी मेहनत घेतली आहे. त्यात मुलगी सना शिंदे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. शाहीर साबळेंच्या पहिल्या पत्नी म्हणजेच भानुमती साबळे यांची भूमिका सना शिंदे साकारणार आहे.
हेही वाचा - 'कान्हा चित्रपटावेळच्या वैभवची आणि आता सर्किट...' अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत
लेक सनाबरोबर काम करताना मला दडपण आलं होतं असं केदार शिंदे सांगितलं. ते म्हणाले, माझी मुलगी सिनेमात काम करतेय ही माझ्यासाठी अभिमान बाब आहे. पण त्यात एक दिग्दर्शक असतो त्याची जबाबदारी जास्त वाढलेली असते. माझं स्पष्ट मत होतं की ती माझी मुलगी म्हणून येऊ नये. तिच्यात तिवढं कॅलिबर आहे का याचा मी अभ्यास केला. ते जेव्हा मला जाणवलं की ही भूमिका करण्यासाठी कोणतंही बॅगेज नसाव. त्या मुलीकडे पाहताना तुम्हाला काही आठवता कामा नये. की अरे ही त्या सिनेमात होती किंवा यात काम केलंय असं होता कामा नये. कोरी पाटी असायला हवी. ती तुम्हाला शाहीरांची पहिली पत्नी भानुमतीच वाटली पाहिजे.
सनाच्या मागे माझी बाप म्हणून जबाबदारी होती. पणजीच्या भूमिकेसाठी माझ्या मुलीला घेतोय त्याची एक जबाबादारी होती. मी दिग्दर्शक होतो त्याची एक जबाबदारी होती. त्यामुळे खूप प्रेशरमध्ये मला सनाबरोबर काम लागलं, असं केदार शिंदे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news