मुंबई, 02 फेब्रुवारी: देशाच्या 75व्या स्वातंत्र्य वर्षात देशातील प्रत्येक राज्याचं स्वत:चं राज्यगीत असावं असं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजातील 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याला महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन या गाण्यातून होतं. येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यातील केवळ दुसरं आणि तिसरं कडवंच राज्यगीतात गायलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शासनानं शाहिर साबळेंच्या या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला मात्र त्यात वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. यावर शाहीर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केदार शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, 'राज्यगीत किंवा राष्ट्रगीताला काही प्रोटोकॉल्स असतात. आधी आपण राज्यगीत नाही म्हणून टाहो करत होतो आणि आता आपल्याला राज्यगीत मिळालं आहे तर ते आपल्याला आपल्या प्रमाणे असावं असं होऊ शकत नाही. राज्यगीत किती सेकंदात किंवा मिनिटात गाणं, असा प्रोटोकॉल असेल तर त्यात मला काही प्रोब्लेब नाहीये. आपण जेव्हा राज्यगीत गाऊ तेव्हा तीन कडवी गाऊयात. तीनच कडवी गायली जावीत असा अट्टाहास नसावा'.
हेही वाचा - Vanita Kharat Wedding: वनिता - सुमितला हळद लागली हो! हास्यजत्रेच्या टीमसह दोघांचा फुल्ल एन्जॉय!
2023 हे शाहिर साबळे यांचं जन्मशताब्दीवर्ष आहे. याचं औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे शाहिरांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. या सिनेमातही जय जय महाराष्ट्र माझा हे गीत असणार आहे. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल यांचं संगीत सिनेमाला लाभलं असून अजय गोगावले जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाणार आहे. महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा 28 एप्रिल 2023ला प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
केदार शिंदे यांच्या आयुष्यात आजोबा शाहिर साबळे यांचं महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्या आजवरच्या जडघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आवाजातील जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला राज्यगीताचा मान मिळताच केदार शिंदे यांनी पोस्ट लिहित आठवणींना उजाळा दिला. त्यांनी लिहिलंय, 'माझे खरे हिरो #महाराष्ट्रशाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलत. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील'.
'या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल रोजी जेव्हा तमाम जनता सिनेमा पाहील आणि तुमच्या कार्याला मानाचा मुजरा करेल, तेव्हाच मी जन्माला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल',असं केदार शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.