मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /20 वर्षांनंतर प्रशांत दामले-कविता मेढेकर सांगतायत संसाराची 'पुढची गोष्ट'

20 वर्षांनंतर प्रशांत दामले-कविता मेढेकर सांगतायत संसाराची 'पुढची गोष्ट'

पुन्हा एकदा प्रशांत-कविताची जोडी रंगभूमीवर जादू करायला सज्ज झालीय. ते घेऊन येतायत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'.

पुन्हा एकदा प्रशांत-कविताची जोडी रंगभूमीवर जादू करायला सज्ज झालीय. ते घेऊन येतायत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'.

पुन्हा एकदा प्रशांत-कविताची जोडी रंगभूमीवर जादू करायला सज्ज झालीय. ते घेऊन येतायत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'.

    मुंबई, 12 आॅक्टोबर : प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' नाटकानं इतिहासच घडवला. या नाटकाचे तब्बल 1800 प्रयोग झाले. पुन्हा एकदा प्रशांत-कविताची जोडी रंगभूमीवर जादू करायला सज्ज झालीय. ते घेऊन येतायत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'.

    प्रशांत दामले या नव्या नाटकाबद्दल खूपच उत्साही आहे. न्यूज18लोकमतच्या वेबसाईटशी बोलताना प्रशांत म्हणाला, ' 1998ला हे नाटक पहिल्यांदा आलं. नाटकातल्या मन्या आणि मनीचं लग्न तेव्हा अगदी नवीन होतं. आता लग्न होऊन इतकी वर्ष झालीयत. लग्नात एक साचलेपण आलंय. कुटुंब वाढलंय. त्यातल्या गमतीजमतींचं हे नाटक आहे.'

    एका लग्नाची गोष्ट अगोदर कविता करत होती. पण मध्यंतरी तिनं ब्रेकही घेतला होता. ' हो, मी नाटक थांबवलं होतं. मुलांकडे पूर्ण लक्ष द्यायचं होतं.पण आता मला नाटक करायचं होतंच. प्रशांतबरोबरच करायचं होतं असंही नव्हतं. पण तरीही त्याच्याबरोबर आधी खूप काम केल्यामुळे प्रशांत माझा पहिला चाॅइस नक्कीच होता.' कविता सांगते. तिला एखादं हलकंफुलकं नाटक हवं होतं. त्यामुळेच दिग्दर्शक अद्वैत दादरकरच्या कल्पनेला कवितानं होकार दिला.

    प्रशांत दामलेच्या डोक्यात इतक्या हिट नाटकाचा सिक्वल होता काय? प्रशांत सांगतो, ' अजिबात नाही. ही कल्पना सुचली अद्वैत दादरकरला. त्यानं आम्हाला वन लाईन ऐकवली आणि आम्हाला ती आवडली. '

    हे नवं नाटक वेगळं आहे. त्यात आता आॅफिसही आहे. सेक्रेटरी आहे. काही निगेटिव्हिटीही आहे.

    कविता सांगते, ' ही एका लग्नाची पुढची गोष्ट जरी असली, तरी पहिली गोष्ट माहीत असण्याची काहीच गरज नाही. लोक हे नाटक नव्यानं बघू शकणार आहेत. कारण आधीचे संदर्भ असले तरी कथा नवीच आहे.'

    या नाटकाबद्दल बोलताना प्रशांत सांगतो, 'नाटकातल्या काही गोष्टी आमच्या वयोगटाशी संबंधित आहेत, तर काही गोष्टी तरुण पिढीशी संबंधित आहे. त्यामुळे आजच्या पिढीलाही हे नाटक रिलेट होऊ शकतं.'

    जुन्या आणि नव्या नाटकाची अजिबात तुलना होऊ शकत नाही, असं प्रशांतचं म्हणणं आहे. ' कारण वीस वर्षांनी समोर आलेले मनी आणि मन्या खूप बदललेत. त्यांचा दृष्टिकोनही वेगळा आहे.'

    या नाटकात प्रशांतच्या गाण्यांची ट्रीट पुन्हा एकदा मिळणार आहे. ही परी आणि मला सांगा ही दोन जुनी गाणी तर आहेतच. पण एक नवं गाणंही आहे.

    हे नाटक प्रेक्षकांना काय देणार? यावर प्रशांत म्हणतो, ' ही तुमचीच गोष्ट आहे. ती बघताना अरे हे तर माझ्याही आयुष्यात झालं होतं, असं तुम्हाला वाटेल.'

    यावर कविता म्हणते, 'प्रेक्षक घरी जाताना हसू घेऊन जातील एवढं नक्की.'  खूप दिवसांनी कविता रंगभूमीवर येतेय, म्हणून ती खूपच आनंदात आहे. रंगभूमी तिचं पहिलं प्रेम.

    नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येतंय. प्रशांत-कविताची केमिस्ट्री पुन्हा एकदा बहरणार. रसिक प्रेक्षक पुढची गोष्ट पहायला नक्कीच उत्सुक आहेत.

    VIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या

    First published:

    Tags: प्रशांत दामले