मुंबई, 05 डिसेंबर: समजात अशी काही माणसं असतात जी स्वत:पेक्षा जास्त इतरांसाठी जगतात. कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati 12) सहभागी झालेल्या पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे (Dr. Ravindra Kolhe) आणि सौ. स्मिता रवींद्र कोल्हे यांचं कामही लोकांना प्रभावित करणारं आहे. हे दाम्पत्य गेल्या 32 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी काम करत आहे. त्यांच्यावर अगदी एका रुपयात उपचार करत आहेत. रवींद्र म्हणाले, ‘मी एक रुपया घेऊन रुग्णांवर उपचार करत असे. कधी कधी महिन्याला फक्त 400 रुपये कमाई होत असे.’ रविंद्र यांनी फक्त लोकांवर उपचार न करता त्यांच्या मनातल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही काम केलं आहे. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून स्वत: अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) प्रभावित झाले.
रवींद्र यांच्या कामात त्यांच्या पत्नीनेही त्यांना उत्तम साथ दिली आहे. लग्नासाठी त्यांनी स्मिता यांना 4 अटी घातल्या होत्या. त्या अशा की, ‘माझी पत्नी 40 किलोमीटर पायी चालणारी, 5 रुपयात लग्न करण्यास तयार असलेली, गरज पडल्यास गरीब रुग्णांसाठी भीक मागायची तयारी दाखवणारी आणि 400 रुपये महिन्यात घर चालवणारी बायको हवी होती असं ते म्हणाले.’ स्मिताताई आणि कर्मवीर रवींद्र कोल्हे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.
पद्मश्री रविंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांनी या खेळामध्ये 25 लाखांची रक्कम जिंकली. याचा वापर ते सामाजिक कार्यासाठी करणार आहेत. त्यांना विचारलेला शेवटचा प्रश्न होता की, ‘खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी, 1942 च्या भारत छोडो आंदोलनामध्ये बंदी बनवण्यात आलेल्या लोकांची वकिली केली होती.’ त्याला पर्याय होते, ‘A. धोंडो केशव कर्वे, B.बाबा आमटे, C विनोबा भावे आणि D नानाजी देशमुख’ या प्रश्नाचं योग्य उत्तर बाबा आमटे असं आहे.