मुंबई, 22 नोव्हेंबर: बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पणातच लक्ष वेधून घेणारा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) लाखो हृदयांची धडकन बनला आहे. देखणेपणा आणि उत्तम अभिनय या जोरावर कार्तिकनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या देखणेपणावर अभिनेत्री सारा अली खानदेखील फिदा झाली होती. अशा या बॉलिवूडचा हँडसम हंक (Handsome Hunk) म्हणून ओळख असलेल्या कार्तिक आर्यनचा आज 31 वा वाढदिवस (Birthday)आहे. त्यानिमित्त त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
इतर कलाकारांपेक्षा थोडी वेगळी अभिनय शैली असणाऱ्या कार्तिकने विनोदी आणि रोमँटिक नायक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे तो प्रचंड लोकप्रिय आहे, विशेषत: मुलींमध्ये त्याची क्रेझ आहे. लाखो मुलींच्या हृदयाची तो धडकन आहे. कार्तिक आर्यन सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी तो आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने आपल्या गोवा ट्रिपचे (Goa Trip) फोटो शेअर केले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कार्तिकचा जन्म 22 नोव्हेंबर 1990 रोजी मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) ग्वाल्हेर (Gwalior) येथे झाला. त्याचे शालेय शिक्षण ग्वाल्हेर इथं झालं. त्यानंतर तो मुंबईत अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आला. त्यावेळी कॉलेजसोबतच तो मॉडेलिंगही करायचा. याच दरम्यान त्यानं निर्माता कुमार मंगत आणि दिग्दर्शक लव रंजन यांची भेट घेतली. लव रंजन यांनी त्याला 'प्यार का पंचनामा' हिंदी चित्रपटमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर 'आकाश वाणी' आणि 'कांची' अशा दोन चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं पण हे चित्रपट आपटले.
यानंतर कार्तिकनं लव रंजनच्या 'प्यार का पंचनामा 2' मध्ये काम केलं. हा चित्रपट मात्र सुपरहिट ठरला. यानंतर तो 'सोनू के टीटू की स्वीटी'मध्ये दिसला. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. कार्तिकने 'लुका छुपी' आणि 'पति पत्नी और वो' सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातही काम केलं आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली. नुकताच प्रदर्शित झालेला 'धमाका' हा त्याचा चित्रपट सुपरहिट ठरला असून, हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता तो 'भूल भुलैया 2', 'शहजादा' आणि 'फ्रेडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दरम्यान, 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'लव्ह आज कल 2' च्या प्रमोशनच्या वेळी कार्तिकने सांगितलं होतं की, त्याला16 व्या वर्षी पहिली गर्लफ्रेंड (Girlfriend) मिळाली आणि त्यावेळी डेटवर जात असताना त्याला भीती वाटायची की कुणी आपल्याला पाहणार तर नाही ना?
आता लाखो मुली त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार असून, यात सेलेब्रिटी अभिनेत्रींचाही समावेश आहे. त्याच्या अफेअर्सची चर्चा सुरू असते, अनेकींशी त्याचं नाव जोडलं जातं, पण अद्याप त्यानं अधिकृतरित्या काही सांगितलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment