मुंबई, 07 जानेवारी : 2022 मध्ये कांतारा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या ब्लॉकबस्टर चित्रपटात मुरलीधर नावाची वनअधिकाऱ्याची व्यतिरेखा साकारणारा अभिनेता किशोर कुमारने नुकतेच केजीएफ - चॅप्टर 2 या चित्रपटाविषयी आपले विचार व्यक्त केले. ``2022 मध्ये सुपरहिट ठरलेला कन्नड भाषेतील अभिनेता यशचा चित्रपट पाहिला का ?`` असा प्रश्न या अभिनेत्याला विचारण्यात आला. ``मला केजीएफच्या कथनाची शैली आवडत नाही, असा खुलासा किशोरने केला. ``अशा `माइंडलेस` चित्रपटांऐवजी, मी महत्त्वाच्या विषयांवर आधारित छोटा पण महत्त्वपूर्ण आशय असलेल्या चित्रपटांना जास्त प्राधान्य देतो,`` असं किशोर म्हणाला.
``मी केजीएफ 2 पाहिलेला नाही. ही गोष्ट बरोबर आहे की चूक ते मला माहीत नाही. तो माझ्या टाइपचा सिनेमा नव्हता. अर्थात ही माझी वैयक्तिक आवड आणि मत आहे,`` असं किशोरनं `इंडिया टुडे`शी बोलताना सांगितलं. ``याऐवजी मी एक छोटासा आणि गंभीर चित्रपट पाहणं पसंत करेन, भले तो यशस्वी नसेल, पण त्यात दुर्लक्ष करण्यासारखंदेखील काहीच नसेल,`` असं किशोरनं सांगितलं.
हेही वाचा - Karan Johar: करण जोहर शार्क टँकच्या 'या' जजवर जाम भडकला; 'हे' आहे कारण
दुसरीकडे,गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कांतारा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना केजीएफमधील अभिनेता यशने या चित्रपटाचं विशेष कौतुक केलं होतं. जेव्हा एका कॉन्क्लेव्हच्या सूत्रसंचालकाने सुरुवातीला कांताराला `तुमचा (कन्नड प्रेक्षकांचा) चित्रपट` असं संबोधलं, तेव्हा यशने त्याला अडवलं आणि ``तुमचा चित्रपट नाही तर कन्नड चित्रपट,`` असं नमूद केलं. ``सर तो (कांतारा) माझाही चित्रपट आहे. तुम्ही म्हणालात की हा माझा नाही. पण हा माझाही चित्रपट आहे,`` असं यशने सांगितलं. यशने कन्नड चित्रपटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली.
केजीएफः चॅप्टर 2 हा एक अॅक्शनपट असून, ज्यात यशने राजा कृष्णप्पा बैर्या उर्फ रॉकी नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रविना टंडन, प्रकाश राज आणि राव रमेश या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे. रॉकीचा शत्रू अधीराची भूमिका संजय दत्तने तर पंतप्रधान रिमा सेनची भूमिका रवीना टंडनने साकारली आहे.
उग्रम्म आणि केजीएफनंतर दिग्दर्शक प्रशांत नीलचा हा चित्रपट होता. केजीएफ : चॅप्टर 2ने 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे बाहुबली 2 आणि अभिनेता अमीर खानच्या दंगल या चित्रपटानंतर केजीएफ : चॅप्टर 2 हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला. आता चाहते केजीएफच्या तिसऱ्या सिक्वेलच्या प्रतीक्षेत आहेत, पण याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान अभिनेता किशोर कुमारसाठी हा कालावधी सर्वोत्कृष्ट ठरत आहे. यापूर्वी तो बहुप्रशंसित सीरिज शी सीझन -2 मध्ये प्रमुख भूमिकेत दिसला होता. या वेबसीरिजमधील त्याच्या कामाची चाहते आणि समीक्षकांनी प्रशंसा केली होती. तथापि, कांतारा हा त्याचा 2022 मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. अभिनेता ऋषभ शेट्टीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट झाला. देश आणि परदेशातील अनेक सिनेस्टार आणि समीक्षकांना त्याने प्रभावित केले. अभिनेता किशोर लवकरच रेड कॉलर या रुमर्ड सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, South indian actor