मुंबई, 12 सप्टेंबर : आधी आपलं ऑफिस तोडण्यासाठी आलेल्या BMC ला अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana ranaut) बाबराचं सैन्य म्हटलं होतं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) तिनं थेट रावण (ravana) म्हटलं आहे. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात नवं ट्वीट करत पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात नवं वादग्रस्त ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं उद्धव ठाकरेंना रावणाच्या भूमिकेत दाखवलं आहे.
BMC ने ऑफिस पाडल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागोमाग अशा संतप्त ट्वीटचा भडीमार केला. आता तिनं नवं ट्वीट मराठी भाषेतच केलं आहे. तिनं आपला मराठी ठसका दाखवला आहे. कंगनाने या ट्वीटसह एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कंगना राणी लक्ष्मीबाई आहे आणि उद्धव ठाकरेंना रावण बनवलं आहे. ज्यांच्यामागे बुल्डोझर दाखवला आहे आणि रावणदहन होताना दाखवलं आहे. तर शिवाजी महाराज हे राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत असलेल्या कंगनाच्या हातात तलवार देत आहेत.
Received many memes, this one sent by my friend @vivekagnihotri ji made me emotional.
लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन.
जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन
हा फोटो विवेक अग्निहोत्रीचं असल्याचं कंगनानं सांगितलं आहे. हा फोटो पाहून मी खूप भावनिक झाले, मला गहिवरून आलं असंही कंगना म्हणाली. फोटोसह कंगनाने मराठीत ट्वीट केलं आहे. कंगना म्हणाली, "लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहिन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहिन. जय हिंद, जय महाराष्ट्र"
बाबराचं सैन्य
कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचं म्हटलं. "मणिकर्णिका सिनेमाची अयोध्येत घोषणा झाली होती. त्यामुळे हे ऑफिस मला राम मंदिराप्रमाणेच आहे. आज इथं बाबर आले. इतिहास पुन्हा एकदा घडणार आहे. ज्या प्रकारे राम मंदिर पुन्हा बनलं. तसंच हे ऑफिसही परत तयार होणार आहे", असं कंगना म्हणाली.
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख
मुंबईत आल्या आल्याच कंगनाने Video पोस्ट करून आपले इरादे निश्चित केलं. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत "तुमने जो किया अच्छा किया. आज माझं घर तुटलं आहे, उद्या अहंकार तुटेल", असं ती उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाली.
"करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन त्यांनी माझं ऑफिस उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते! "मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही", असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली.
कंगनाच्या अडणीत वाढल्या
मुंबई पोलिसांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी शब्दांमध्ये तोंडसुख घेणाऱ्या कंगनाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनधिकृत कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर कंगनाची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. कारण महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत कंगना आणि ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश देण्यात आला. या आदेशाची प्रत आता मुंबई पोलिसांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
कंगनावरील कारवाईवरून अयोध्येत संतापाची लाट उसळली आहे. 'उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये', असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हनुमानगढीच्या महंतांनी दिला आहे.
कंगना राज्यपालांची भेट घेणार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. उद्या ही भेट होण्याची शक्यता आहे. कंगनाचा महाराष्ट्र सरकारसोबत संघर्ष सुरू असतानाच तिने राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उद्या ही भेट होणार का आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.