मुंबई, 06 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे समीकरण कायम पाहायला मिळतं. तिची विधानं किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा वाद निर्माण होतात. सध्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कंगना जोरदार चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीला घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. तसंच तिच्यावर झूम लेन्सच्या माध्यमातून कुणीतरी पाळत ठेवतंय, असंदेखील कंगनाच्या या पूर्वीच्या पोस्टमधून दिसून येतं. कंगनाच्या अलीकडच्या पोस्ट आणि तिचा इशारा नेमका काय आहे, ते जाणून घेऊया.
अभिनेत्री कंगना राणावतच्या इन्स्टाग्राम मेसेजने पुन्हा एकदा सर्वांना गोंधळात टाकलं आहे. माझ्या आसपास आता काहीही संशयास्पद घडत नाही, असं तिनं तिच्या हितचिंतकांना सांगितलं आहे. यासोबत तिनं चंगू-मंगू गँगला एक मेसेज दिला आहे. 'लोकांना वाटतं मी वेडी आहे. पण मी किती वेडी आहे हे त्यांना माहिती नाही', असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. रविवारी कंगनाने इन्स्टा स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. त्यात तिनं एक सेलेब्रिटी कपल विभक्त होण्याविषयी भाष्य केलं होतं. लोकांना हे भाष्य आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी असल्याचं वाटत आहे. तिच्या या नव्या पोस्टवरून लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.
एक दिवसापूर्वी कंगनाने एक पोस्ट केली होती.त्यात तिनं तिच्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याचं म्हटलं होतं. मला कॅप्चर करण्यासाठी काही लोकांनी ठिकठिकाणी झूम लेन्स लावल्याचा दावाही तिनं केला होता. या सर्व गोष्टी करण्यामागे अशा व्यक्तीचा हात आहे, ज्याचे अनेक महिलांसोबत संबंध होते. या व्यक्तीच्या पत्नीने तिच्या विवाहावेळी जी साडी परिधान केली होती, तशीच साडी मी माझ्या भावाच्या रिसेप्शनवेळी परिधान केली होती, अशी हिंटदेखील कंगनाने या वेळी दिली. ही गोष्ट त्यावेळी जोरदार चर्चेत होती. कंगनाच्या पोस्टचा रोख आलिया-रणबीरकडे असल्याची अटकळ लोक बांधत आहेत. ही व्यक्ती आणि त्याची पत्नी एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे राहत असल्याचं कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, त्यानंतरच्या पोस्टमध्ये कंगना लिहिते, 'जे कोणी माझ्यासाठी चिंतीत आहेत, त्यांनी माझी काळजी करू नये. कारण काल रात्रीपासून माझ्या आसपास कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आलेली नाही. मला कोणीही फॉलो करत नाहीये. ज्यांना केवळ फटक्याची भाषा समजते, त्यांना त्याच भाषेत सांगावं लागतं. चंगू मंगूला मेसेज.... तुमचा सामना सामान्य व्यक्तीशी नाही त्यामुळे जरा नीट वागा नाहीतर मी घरात घुसून मारेन. इतरांप्रमाणे तुम्हालादेखील माहिती आहे मी वेडी आहे, परंतु मी किती वेडी आहे हे कदाचित माहिती नसेल'. कंगनाच्या या दोन्ही पोस्टमुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असून, तिचा रोख नेमका कोणाकडे आहे, या विषयी लोक वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News