"मला घाबरण्याचा प्रयत्न केला तर...", कंगनाचा मराठी ठसका, पाहा नवं Tweet

अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) थेट मराठीत TWEET करून आव्हान दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) मुंबईला पाक म्हटल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. अनेक मराठी कलाकारही तिच्यावर संतप्त झाले. मुंबईत मराठी माणसांसाठी झटणाऱ्या शिवसेनेशीच तिने पंगा घेतला. थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत तिने निशाणा साधला. या सर्वांमुळे तिच्या अडचणीत खूप वाढ झाली आहे. मात्र आता कंगनाने निर्भीडपणे आपला मराठी बाणा दाखवला आहे.

BMC ने ऑफिस पाडल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकामागोमाग अशा संतप्त ट्वीटचा भडीमार केला. आता तिनं नवं ट्वीट मराठी भाषेतच केलं आहे. तिनं आपला मराठी ठसका दाखवला आहे. फिल्ममध्ये झाशीची राणी साकारणाऱ्या कंगना रणौतने राणी लक्ष्मीबाई आणि शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवत, त्यांच्या पावलांवर पावलं ठेवण्याचा निश्चय केला आहे.

कंगना म्हणाली, "लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहिन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहिन. जय हिंद, जय महाराष्ट्र"

हे वाचा - कंगनाचा पाय खोलात? अडचणी वाढवणाऱ्या आदेशाची प्रत मुंबई पोलिसांच्या हाती

कंगनाने या ट्वीटसह एक फोटो पोस्ट केला आहे. जे विवेक अग्निहोत्रीचं असल्याचं तिनं सांगितलं आहे. या फोटोत कंगना राणी लक्ष्मीबाई आहे आणि शिवाजी महाराज तिच्या हातात तलवार देत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागे बुल्डोझर दाखवत त्यांना रावण बनवलं आहे आणि रावणदहन होताना दाखवला आहे. हा फोटो पाहून मी खूप भावनिक झाले, मला गहिवरून आलं असंही कंगना म्हणाली.

हे वाचा - कंगना Vs शिवसेना : 24 तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कंगनाची डायलॉगबाजी

मुंबई पोलिसांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी शब्दांमध्ये तोंडसुख घेणाऱ्या कंगनाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनधिकृत कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर कंगनाची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. कारण महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत कंगना आणि ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश देण्यात आला. या आदेशाची प्रत आता मुंबई पोलिसांच्या हाती सोपवण्यात आली आहे. कंगनावरील कारवाईवरून अयोध्येत संतापाची लाट उसळली आहे. 'उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये', असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह हनुमानगढीच्या महंतांनी दिला आहे.

कंगना राज्यपालांची भेट घेणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. उद्या ही भेट होण्याची शक्यता आहे. कंगनाचा महाराष्ट्र सरकारसोबत संघर्ष सुरू असतानाच तिने राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उद्या ही भेट होणार का आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Priya Lad
First published: September 12, 2020, 5:43 PM IST

ताज्या बातम्या