मुंबई, 05 एप्रिल : बॉलिवूड क्वीन कंगना रणौत सध्या दिल्लीमध्ये तिचा आगामी सिनेमा 'पंगा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काल (04 एप्रिल) कंगना दिल्लीत फिरायाला गेली होती. यावेळी तिची नजर तिथं असलेल्या 'चाट सेंटर'वर पडली आणि कंगनाला या ठिकाणी पाणीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. तिनं चक्क गाडी थांबवून पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेतला. दिल्लीच्या रस्त्यावर पाणीपुरी खाताना पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. कंगनाच्या टीमनं पाणीपुरी खातानाचा तिचा फोटो 'मिशन गोलगप्पा' अशा कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला. पाणीपुरी खातानाचा कंगनाच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.
कंगनाला दिल्लीच्या रस्त्यावर अशाप्रकारे बिनधास्त पाणीपुरी खाताना पाहून अनेकाना तिच्या 'क्वीन' सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. या सिनेमात ती अॅम्स्टडर्ममध्ये भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूडच्या स्टॉलवर पाणीपुरी विकताना दिसली होती. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला आणि तिच्या हटके भूमिकेचही कौतुक झालं होतं. लवकरच कंगना 'पंगा' या सिनेमात दिसणार असून यात ती एका कबड्डीपटूची भूमिका साकारणार आहे. मात्र तिच्या या मिशन पाणीपुरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
2019च्या सुरुवातीला रिलीज झालेल्या कंगनाच्या 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी'चं बरंच कौतुक झालं. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. सध्या कंगनाकडे 'मेंटल है क्या' आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक 'जया' हे दोन सिनेमे आहेत. यातील 'मेंटल है क्या' मध्ये संजना पुन्हा एकदा राज कुमार राव सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर 'जया' बायोपिकसाठी कंगनानं बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून घेतल्याची चर्चा आहे.