मुंबई, 10 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजद्रोहाच्या आरोपावरुन कंगनाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) समन्स बजावलं होतं. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलला (Rangoli Chandel) पोलिसांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहायला सांगितलं होतं. पण भावाच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहे असं सांगत तिने मुंबईला येण्याचं टाळलं. त्यानंतर दुसऱ्यांदा पोलिसांनी कंगनाला आणि तिच्या बहिणीला समन्स बजावलं होतं. '10 नोव्हेंबर 2020 रोजी उपस्थित राहा' असे आदेश देण्यात आले होते. पण भावाच्या लग्नाचं कारण देत तिने पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचं टाळलं आहे.
मंगळवारी 10 नोव्हेंबरला कंगनाच्या भावाचं लग्न आहे. त्यामुळे कंगना आणि तिच्या बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहण्यासाठी नकार दिला आहे. रणौत बहिणींचं म्हणणं आहे की, भावाचं लग्न झाल्यानंतरच आम्हाला मुंबईला येणं शक्य होईल. राजद्रोहाच्या आरोपावरुन कंगना रणौतला हे समन्स बजावण्यात आलं होतं. तिने महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत चुकीच्या शब्दात मत प्रदर्शित केलं होतं.
वांद्रे पोलिसांनी कंगना रणौत आणि तिच्या बहिणीला 21 ऑक्टोबरच्या आधी पहिली नोटीस पाठवली होती. पण तिच्या वकीलांनी सांगितलं की, कंगना आणि रंगोली सध्या भावाच्या लग्नात व्यस्त आहेत. त्या दोघी सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईला येणं शक्य होणार नाही. कंगना रणौतच्या या भूमिकेवर मुंबई पोलीस आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसात कंगनाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.