तू माझ्यासाठी केलेला त्याग कधीच विसरता येणार नाही; आईच्या वाढदिवसानिमित्त काजल अग्रवालची भावुक पोस्ट

तू माझ्यासाठी केलेला त्याग कधीच विसरता येणार नाही; आईच्या वाढदिवसानिमित्त काजल अग्रवालची भावुक पोस्ट

काजल अग्रवालने (Kajal Aggarwal) आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या दोघींमध्ये असलेलं स्टाँग नातं दिसून येतं.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: आई आणि मुलीचं नातं सर्वात सुंदर असतं. मुलगी कितीही मोठी झाली, लग्न होऊन सासरी गेली तरीही तिच्या मनातलं आईचं स्थान कमी होत नाही. अभिनेत्री काजल अग्रवालचंही (Kajal Aggarwal) असंच झालं आहे. नुकतंच तिचं लग्न झालं आता ती पती गौतम किचलू (gautam kitchlu) सोबत राहते. पण तिला आईची आठवण आजही सतावते. काजलने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी एक भावुक पोस्ट लिहीत तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. या पोस्टमधून काजलचं आणि तिच्या आईचं नातं किती घट्ट आहे हे दिसून येतं. काजलची इन्स्टाग्राम पोस्ट वाचून आपल्यालाही आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही

काय आहे काजलच्या पोस्टमध्ये?

काजल अग्रवाल लिहीते, ‘दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वत: त्याग करण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल प्रेम असावं लागतं. आई तुझा मनमिळावू स्वभाव, तुझं सौंदर्य, तुझी हुशारी या गुणांची करावी तेवढी स्तुती कमी आहे पण दुसऱ्याला आनंद देण्याचा तुझा स्वभाव मला सर्वात जास्त भावतो. जिथे जाशील तिथे तू सर्वांना आनंदी करुन टाकतेस. तुझ्याकडे असलेली सकारात्मक उर्जा तू सर्वांना वाटतेस. तुझं व्यक्तीमत्व अद्भूत आहे. माझी प्रत्येक महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी तू माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलीस. तू माझ्यासाठी केलेला त्याग कधीच विसरता येणार नाही. माझं व्यक्तिमत्व तुझ्यासारखं असावं असं मला नेहमी वाटतं. कधी कधी लोकं मला म्हणतात तू तुझ्या आईसारखीच आहेस तेव्हा माझा उर अभिमानाने भरुन येतो. मला प्रचंड आनंद होतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. मी ओळखत असलेल्या व्यक्तींपैकी तू सर्वात तेजस्वी आणि उत्तम स्त्री आहेस. देवाची कृपादृष्टी तुझ्यावर कायम राहू देत.’ काजलच्या या पोस्टमध्ये तिने आपल्या आईच्या स्वभावतला एक अन् एक पैलू उलगडून दाखवला आहे. काजलच्या पोस्टवर अनेकांनी लाइक्स केले आहेत आणि तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

काजल अग्रवालचं 30 ऑक्टोबर मुंबईत रोजी लग्न झालं. गौतम किचलूचा इंटीरिअरचा व्यवसाय आहे. काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमातही तिनं काम केलं आहे. अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिनं काम केलं होतं.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 20, 2020, 10:28 AM IST
Tags: Instagram

ताज्या बातम्या