News18 Lokmat

अफगाणिस्तानात जन्मलेल्या कादर खान यांचा असा होता संघर्षमय प्रवास

२२ ऑक्टोबर १९३७ साली अफगाणीस्तानातील कंदहार शहरात जन्मलेल्या कादर खान यांचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखंच रंजक आहे. न्यूज18लोकमतच्या वेबसाईटची आदरांजली

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 11:12 AM IST

अफगाणिस्तानात जन्मलेल्या कादर खान यांचा असा होता संघर्षमय प्रवास

विराज मुळे, प्रतिनिधी


मुंबई, 1 जानेवारी : २२ ऑक्टोबर १९३७ साली अफगाणिस्तानातील कंदहार शहरात जन्मलेल्या कादर खान यांचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखंच रंजक आहे.शम्स रेहमान आणि फझल या आपल्या तीन भावांसह फाळणीनंतर भारतात आलेल्या खान यांनी मुंबईची वाट धरली.

मुंबईतल्या इस्माईल युसुफ संस्थेतून आधी शालेय आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर भायखळ्याच्या साबु सिद्दीकी कॉलेजमधून ते सिव्हिल इंजिनिअर झाले.१९७० ते ७५ या कालखंडात त्यांनी प्राध्यापक म्हणून या महाविद्यालयात नोकरी केली.

मात्र मुंबईत आलेल्या प्रत्येक तरूणाला असते तशीच खान यांनाही रंगभूमीने भुरळ घातली. महाविद्यालयात रंगभूमीवर नाटकं लिहिणाऱ्या खान यांच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. अचानक त्यांना 'जवानी दिवानी' हा सिनेमा लिहिण्याची संधी मिळाली आणि या संधीमुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

Loading...

तब्बल ३०० सिनेमांमध्ये काम केलेल्या आणि २५० सिनेमांची पटकथा किंवा संवाद लिहिलेल्या कादर खान यांना दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी राजेश खन्नांच्या 'रोटी' हा सिनेमा लिहिण्याची संधी दिली. या सिनेमानंतर त्यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, फिरोझ खान यांच्यासाठी अनेक सिनेमांचं लेखन केलं.

अमिताभ यांच्या कारकिर्दीतील मिस्टर नटवरलाल, सत्ते पे सत्ता, इन्कलाब, अग्नीपथ आणि नसीब या सिनेमांचं लेखन कादर खान यांचं होतं. तर त्यांच्यासोबतच अनेक सिनेमांमध्ये खान यांनी कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे अमिताभ यांच्या व्यतिरिक्त मनमोहन देसाई आणि मनोज देसाई या परस्पर विरोधी कँप्समध्ये एकाच वेळी काम करणारे ते एकमेव लेखक होते.

१९८८ साली आलेल्या हिम्मतवाला या सिनेमानंतर त्यांनी विनोदी भूमिकांकडे आपला मोर्चा वळवला. त्यानंतर आंखे, मैं खिलाडी तू अनाडी, दुल्हे राजा, कुली नंबर वन यासाख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी असरानी, शक्ती कपूर, अरूणा इराणी यांच्यासोबत भूमिका साकारल्या.यातील बहुतांश सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.

१९८२ साली त्यांना मेरी आवाज सुनो या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९१ साली सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर १९९३ साली आलेल्या अंगार या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर तब्बल ९ वेळा वेगवेगळ्या विभागात त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं.

२०१६ मध्ये त्यांना मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र सुदैवाने ती खोटी ठरली.'हो गया दिमाग का दही' हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. यानंतर त्यांचा त्रास वाढल्याने ते पुढील उपचारांसाठी कॅनडाला रवाना झाले.

मुकद्दर का सिकंदर सिनेमात अमिताभला जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या फकीराची भूमिका कादर खान यांनी साकारली होती.


कादर खान यांचे सन्मान


1982   मेरी आवाज सुनो             सर्वोत्कृष्ट कथा

1991   बाप नंबरी बेटा दस नंबरी   सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता

1993   अंगार                           सर्वोत्कृष्ट संवाद लेखक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 11:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...