मुंबई 23 मार्च : भारतीय हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी सून 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतील तुलसी विरानी म्हणजे अभिनेत्री (Tv Actress), खासदार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा आज 45 वा वाढदिवस आहे. मॉडेलिंगपासून अभिनेत्री आणि तिथपासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी स्मृती यांनी मोठा खडतर प्रवास केला आहे. सध्या त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये (Modi Government) वस्रोद्योग व बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आहेत.
स्मृती यांचा जन्म 23 मार्च 1976 ला दिल्लीत झाला. तिघी बहिणींमधील सर्वांत मोठ्या स्मृतींनी 12 वी नंतर दिल्ली विद्यापीठातील दूरस्थ स्कूल ऑफ लर्निंगमधून शिक्षण घेतलं. 1998 मध्ये स्मृतींने मिस इंडिया पेजेंट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्याचवर्षी गायक मिकासिंगच्या 'सावन में लग गई आग' या गाण्यातही त्या दिसल्या होत्या. खूप कमी जणांना माहिती असेल की मॉडेलिंगच्या क्षेत्रात येण्याआधी स्मृतींने मॅकडोनाल्ड्जमध्ये नोकरी केली होती.
2000 मध्ये स्मृती यांनी 'आतिश', 'हम हैं कल आज और कल' या मालिकांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. एकता कपूरच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील भूमिकेने स्मृती यांचं आयुष्यच बदललं. या मालिकेमुळे त्या घरोघरी पोहोचल्या. या मालिकेत स्मृती यांनी केलेल्या तुलसी या भूमिकेसाठी त्यांना पाच इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड, 4 इंडियन टेली अवॉर्ड आणि 8 स्टार परिवार अवॉर्ड्स मिळाले होते. असं सांगतात की पहिल्यांदा स्मृतींला एकताच्या टीमने रिजेक्ट केलं होतं.
2001 मध्ये आलेल्या 'रामायण' मालिकेत (Ramayan) त्यांनी सीतेची भूमिकाही केली होती. त्याशिवाय स्मृती यांनी 'विरुद्ध' 'तीन बहुरानियां' आणि 'एक थी नायिका' या मालिकांतही काम केलं.
स्मृती यांनी 2001 मध्ये झुबिन इराणी यांच्याशी लग्न केलं. झुबिन यांना पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन झुबिन यांनी स्मृती यांच्यशी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 2003 मध्ये स्मृती यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आणि टीव्हीच्या दुनियेला रामराम ठोकला. त्यानंतर आता त्या केंद्रीय मंत्री आहेत. राजकारणातील त्यांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात पराभव केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Birthday celebration, Entertainment, Modi government, Ramayan, Smriti irani, Tv actress, TV serials