मुंबई, 26 जानेवारी: बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षात देशभक्तीवरील चित्रपटांची क्रेझ वाढत चालली आहे. राझी, बेबी, एअरलिफ्ट यासारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. राझी चित्रपटातून पाकिस्तानमध्ये भारतासाठी हेरगिरी करणाऱ्या एका गु्प्तहेराची कथा दाखवण्यात आली होती. प्रेक्षक देखील अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाद देत आहेत. या मालिकेत आणखी एक चित्रपट येत आहे.
मद्रास कॅफे, परमाणु आणि सत्यमेव जयते या चित्रपटानंतर जॉन अब्राहम आणखी एक देशभक्तीवर आधारीत चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाचे नाव देखील थोडे हटके आहे. रोमियो अकबर वाल्टर या चित्रपटाचा टीझर रिलीझ झाला असून यात जॉनने एका रॉ एजन्टची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले आहे. येत्या 12 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉसाठी काम करणाऱ्या एका एजन्टच्या भूमिकेत जॉन दिसत आहे. चित्रपटात तो विविध भूमिकेत दिसत आहे. एक पोलिस अधिकारी, मुस्लिम व्यक्तीरेखा याशिवाय अनेक लुक्समध्ये जॉनने प्रभावी भूमिका केल्याचे दिसत आहे. सध्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि त्यातील जॉनची हेअर स्टाईल देखील हटके आहे.
काय आहे चित्रपटाची कथा
1970च्या दशकातील एका सत्य घटनेवर हा चित्रपट आहे. चित्रपटाचे चित्रिकरण गुजरात, श्रीनगर, दिल्ली आणि नेपाळच्या सीमेवर करण्यात आले आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी प्रथम सुशांत सिंह रजपूत याला विचारणा करण्यात आली होती. पण तारखा उपलब्ध नसल्याने सुशांतने हा चित्रपट नाकारला.
सलमान खानच्या भारत या चित्रपटाचा टीझर देखील 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. यात सलमान पाच वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसत आहे.
Where do you draw the line when you live and die for your country? Presenting ‘Walter’ from #RAW based on the true story of a patriot. #RAWTeaser coming out today. Stay tuned! @Roymouni @bindasbhidu @sikandarkher @RomeoAkbarWaltr pic.twitter.com/JII3DeQFfB
— John Abraham (@TheJohnAbraham) January 25, 2019