पुणे, 23 जानेवारी : मला सिगारेट आणि दारूचं व्यसन होतं. पैशांची उधळपट्टी करत आयुष्य जगणं सुरू होतं, पण वेळीच सावरलं आणि आता मी या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. व्यसनांपासून दूर राहिल्यानं आता मी एक आनंदी आयुष्य जगत आहे. बालपण गिरगावात गेलं. पंजाबी मुलगा मराठी बोलतो म्हणून मला चित्रपटात पहिल्यांदा काम मिळालं.... ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांनी पडद्यामागच्या आयुष्याविषयी पुण्यात दिलखुलास गप्पा मारल्या.
पुण्याच्या सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवात बॉलीवूडमधली एकेकाळची गाजलेली जोडी जितेंद्र आणि जयाप्रदा यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत जितेंद्र आणि जयाप्रदा यांनी अनेक त्यांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या. दोघांचा बॉलिवूडमधला प्रवास आणि सोबत काम करत असताना एकमेकांशी झालेलं मैत्रीचं नातं यावर अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
'माझ्या रक्तात मराठी'- जितेंद्र
आपलं बॉलिवूडमधलं करिअर, गिरगाव मध्ये राहत असतानाच्या आठवणी आणि नंतर जुहूला आल्यानंतर बदलेलं आयुष्य यावर बोलताना जितेंद्र म्हणाले, "माझ्या रक्तात मराठी संस्कृती भिनलीय. पंजाबी मुलगा असून मराठी बोलतो म्हणून व्ही. शांताराम यांनी मला काम दिलं." आयुष्यात अनेक सुख-दुःख पाहिली असं सांगताना ते म्हणाले, "आज मी 78 वर्षांचा आहे, मी गिरगाव सोडलं त्याला 60 वर्ष झाली. पण माझ्या आयुष्यातले अनमोल क्षण हे गिरगावमधलेच आहेत. गिरगावमध्ये राहत असताना माझ्या घरात ट्यूब लाईट लागली, फॅन लागला तर त्याचं किती कौतुक असायचं चाळीतल्या लोकांना! संपूर्ण चाळ घरी कौतुकापोटी बघायला यायची. आता जुहूला मला माझ्या शेजारी कोण राहतं हेदेखील मला माहीत नाही."
मी एके काळी स्मोकर होतो, अल्कोहोलिक होतो....
या सांस्कृतिक मोहत्सवात बोलताना जितेंद्र यांनी त्यांच्याबद्दल आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली. "मला सिगारेट आणि दारूचं व्यसन होतं. पैशांची उधळपट्टी करत आयुष्य जगणं सुरू होतं मात्र आता मी या सगळ्या गोष्टींपासून दूर आहे. व्यसनांपासून दूर राहिल्यानं आता मी एक आनंदी आयुष्य जगत आहे", असं ते म्हणाले. जयाप्रदा यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, जयाप्रदा या अत्यंत मेहनती आणि उत्तम व्यक्ती आहे. ती एक उत्तम गायिका आहे. मी तिच्याकडून खूप काही शिकलो."
'जितेंद्र यांनी मला खूप सांभाळून घेतलं'- जयाप्रदा
जितेंद्र आणि जयाप्रदा यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे दोघांच्या खूप आठवणी आहेत. दोघांचं नातंही खास आहे. या मुलाखतीत जितेंद्र यांच्याविषयी बोलताना जयाप्रदा म्हणाल्या, "माझ्या सुरुवातीच्या काळात जितेंद्र यांनी मला खूप सांभाळून घेतलं. मला हिंदी भाषा तितकी येत नव्हती. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला, ते माझी प्रेरणा आहेत, माझे हिरो आहेत", अशा शब्दांमध्ये त्यांनी जितेंद्र यांचं त्यांच्यांशी असलेलं नातं बोलून दाखवलं.
80च्या दशकातल्या या जोडीने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिकलं. आजही या दोघांची गाणी अनेकांच्या ओठांवर आहेत. सांस्कृतिक महोत्सवातील या मुलाखतीत त्या दोघांच्या आयुष्यातील अनेक आठवणी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची संधी मिळाली आणि स्थानिक कलाकारांनी या दोघांची गाणी सादरही केली.
पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आलियानं दिली प्रतिक्रियाप्रियांका चोप्रानं फंक्शनमध्ये केला मनिष मल्होत्राचा अपमान, VIDEO VIRALदिशा पाटनीचा हॉट अवतार सोशल मीडियावर व्हायरल, पाहा PHOTO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.