लंडन, 31 ऑक्टोबर : जेम्स बाँडची भूमिका अजरामर करणारे, सर या पदवीने गौरवलेले शॉन कॉनेरी यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. लोकांच्या मनातला बाँड गेला. जेम्स बॉण्ड या काल्पनिक व्यक्तिमत्वाला शॉन कॉनेरी यांनी पहिल्यांदा पडद्यावर उतरवलं. कॉनेरी यांच्यानंतर अनेकांनी बाँड पडद्यावर सादर केला, पण लोकांच्या मनातला ओरिजिनल बाँड म्हणून शॉन कॉनेरी यांचीच प्रतिमा कायम राहिली आहे.
शॉन कॉनेरी अनेक दशकं पडदा गाजवत राहिले. त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय दोन वेळा बाफ्ता, तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्काराने त्यांचा अभिनय गौरवला गेला होता.
बीबीसीने त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. मूळचे स्कॉटलंडचे असणारे शॉन कॉनेरी यांनी अनेक बॉण्डपटात कामं केली.
लागोपाठ 7 बाँडपटांमुळे त्यांची छबी 007 अशीच कोरली गेली. बाँडपटांखेरीज रेड ऑक्टोबर, इंडियाना जोन्स आणि लास्ट क्रूसेडसारख्या इतर चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका निभावल्या.