News18 Lokmat

फिल्म रिव्ह्यु : जग्गा जासूस -रणबीरचा 'ट्युबलाईट'

'जग्गा जासूस' बॉलिवूडमधला एक धाडसी प्रयोग आहे. म्युझिकल थ्रिलर देण्याचं धाडस अनुराग बासूंनी दाखवलं. त्याला रणबीर कपूरच्या अभिनयाची जोड मिळालीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 07:12 PM IST

फिल्म रिव्ह्यु : जग्गा जासूस -रणबीरचा 'ट्युबलाईट'

अमित मोडक, समीक्षक

 

'जग्गा जासूस' बॉलिवूडमधला एक धाडसी प्रयोग आहे. म्युझिकल थ्रिलर देण्याचं धाडस अनुराग बासूंनी दाखवलं. त्याला रणबीर कपूरच्या अभिनयाची जोड मिळालीय.

पण सुरुवातीलाच स्पष्ट करतो, जग्गा जासूस सर्वांसाठी नाही. 'जग्गा जासूस' हे धाडस दिग्दर्शकाची हरवलेली पकड आणि तीन तासांच्या थकवणाऱ्या लांबीत फसलंय. जग्गाची हेअरस्टाईल तुम्हाला 'टीनटीन'ची आठवण करून देते. जग्गाची ट्रीटमेंट 'लालालॅण्ड'ची आठवण देते तर काही सीन्स 'बर्फी'ची आठवण करून देतात.

जग्गा जासूस एक म्युझिकल फिल्म आहे. जवळपास 30च्या आसपास गाणी आहेत. त्याला कारणही तसंच आहे. जग्गा तोतरा आहे, तो अडखळत बोलतो. आणि त्या तोतरेपणावर उपाय आहे गाणी गात बोलणं. आता जरा तुम्ही विचार करा, लीड हीरो अख्ख्या फिल्ममध्ये फक्त गात असेल तर  काय होईल? जो विचार तुम्ही करताय. सुरुवातीला तसंच घडतं.

Loading...

प्रेक्षकांना सर्व प्रकार लक्षात यायला थोडा वेळ लागला.  प्रीतमचं म्युझिक आणि अमिताभ भट्टाचार्याचे लिरिक्सवजा डायलॉग्ज हळूहळू पकड घ्यायला लागतात. 'मिस' गाणं फिल्मचा टोन सेट करत आपणही जरा सावरून बसतो. पण दुर्दैवानं शेवटपर्यंत हा टेम्पो आणि प्रेक्षकांचा पेशन्स टिकत नाही.

जग्गा (रणबीर) अनाथ आहे, तोतरा आहे. अनाथ जग्गाला एक दिवस तुटीफुटी (शाश्वत बॅनर्जी) भेटतो. आणि अनाथ जग्गाला बाबा मिळतात. एकट्या तुटीफुटीला मुलगा मिळतो. 'तुटीफुटी' जग्गाचं आयुष्य बदलून टाकतो. त्याला कॉन्फिडन्स देतो. बाप-लेकाचं छान सुरू  असताना 'तुटीफुटी' जग्गाला होस्टेलमध्ये सोडून जातो आणि त्यानंतर त्या दोघांची भेट होत नाही. पण तुटीफुटी न चुकता जग्गाच्या प्रत्येक वाढदिवसाला एक बर्थडे विश करणारी टेप पाठवतो. दरम्यानच्या काळात जग्गा छोट्या-मोठ्या केसेस सोडवत असतो. अशाच एका केसचा पाठपुरावा करताना  त्याची आणि कतरिना कैफची गाठ पडते. कतरिना पत्रकार आहे. कतरिनाच्या हिंदीचा लोचा बघता तिचं शिक्षण लंडनमध्ये झाल्याचं सांगून दिग्दर्शकानं आपली सुटका करून घेतलीय.

अनुराग बासूंनी अत्यंत हुशारीनं कतरिना  कैफला लिमिटेड केलंय. त्यानंतर एक दिवस जग्गाला त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचं कळतं. पण त्याला ते  जिवंत असल्याचा विश्वास वाटतो आणि मग सुरू होतो जग्गा जासूसचा प्रवास...

कुठे लोचा झाला?

अनुराग बासूनी कथा सांगण्यासाठी निवडलेल्या फॉर्म हीच 'जग्गा जासूस'ची स्ट्रेन्थ आणि विकनेस आहे. जग्गा जासूसबाबत सांगायचं झाल्यास, दिग्दर्शकानं निवडलेला फॉर्म फिल्मचा घात करणारा आहे. कथा अत्यंत प्रिडेक्टेबल आहे. काय होणार याची फारसी उत्सुकता वाटत नाही. दिग्दर्शकाला जे सस्पेन्स वाटतंय ते प्रेक्षकांसाठी ओपन सिक्रेट आहे.

सिनेमाची तीन तासांची लांबी ही सर्वात मोठी अडचण आहे. अनेक सीन्स विनाकारण लांबवलेत. काही सीन्स तर संपता संपत नाहीत. लोकेशन्स, विनोद निर्मिती आणि 'टीनटीन'सारखे काही अॅडव्हेन्चर्स दाखवण्याच्या नादात सिनेमाची कथा हरवते. गाण्यातून कथा सांगण्याचा प्रयत्न धाडसी आहे. पण प्रेक्षकांना हा प्रयोग फारसा पचनी पडेल असं वाटत नाही.

काय आवडलं?

रणबीर कपूर तुम्हाला खिळवून ठेवतो. जग्गा जासूसचा पूर्ण भार त्याच्या खांद्यावर आहे. रणबीर कपूर आणि सिनेमॅटोग्राफर रवी वर्मन जग्गा जासूसचे दोन आधारस्तंभ आहेत. प्रत्येक फ्रेम सुंदर आहे. जेव्हा काही घडत नाही तेव्हा रवी वर्मनचा कॅमेरा आपल्याला सिनेमात गुंतून ठेवतो. 'गलती से मिस्टेक', 'झुमरी तलैया' ही दोन लक्षात राहतात.

'झुमरी तैलया' बर्फीची आठवण करून देतं. शाश्वत बॅनर्जी छाप पाडतात. सौरभ शुक्ला मात्र यावेळी फारसे लक्षात राहत नाहीत. बर्फीमधले सौरभ शुक्ला इथे नाहीत. रणबीर-अनुराग बासू यांनी बर्फीत केलेली धमाल इथं मिसिंग आहे. दोघांनी धाडस केलं असलं तरी रणबीर कपूरसाठी जग्गा जासूस हा ट्युबलाईट ठरू शकतो.

रणबीर आणि अनुरागचा हेतू प्रामाणिक आहे. पण 'बासूंनी गलती से मिस्टेक' केलीय. प्रयोग करण्याचं धाडस  आणि रणबीरच्या अभिनय,जग्गा जासूसला देतो दोन स्टार्स.

 सल्ला

गाण्यांची फारशी आवड नसेल आणि प्रयोगाला दाद देण्याची तयारी नसेल तर 'जग्गा जासूस'पासून लांब राहा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...