एकेकाळी इरफान खानने स्वत: वरच केले होते मीम्स; मुलाने शेअर केले फोटो आणि म्हणाला...
इरफान खान याचे एप्रिलमध्ये मुंबईत इंडोक्रोनाईन ट्युमर या आजाराने निधन झाले. त्यांनी हिंदी सिनेमांबरोबरच ब्रिटीश आणि हॉलिवूडपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली.
मुंबई, 30 नोव्हेंबर : इन्स्टाग्राम टाईमलाईनवर दिवंगत अभिनेता इरफान खान (Irfan Khan) यांच्या दुर्मिळ फोटोंची झलक पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. इरफान खान यांचा मुलगा बबीलदेखील चाहत्यांची ही आवड पूर्ण करत आपल्या वडीलांच्या आठवणींना उजाळा देतो. नुकताच बबीलने इन्स्टाग्रामवर एक फोटो मीम स्वरुपात शेअर केला आहे. हा फोटो इरफान खान यांनी हयात असताना मीम स्वरुपात तयार केला होता.
इन्स्टाग्रामवरील अधिकृत पेजवर बबीलने शेअर केलेल्या या मीममध्ये अभिनेते इरफान खान दोन वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत. यातील पहिल्या छायाचित्रात इरफान यांनी बाथरोब आणि जॅकेट परिधान केले आहे, तर दुसरे छायाचित्र एका पुरस्कार सोहळ्यातील असून त्यात त्यांनी कुर्ता –पायजमा परिधान केला असून त्यावर मॅचिंग जॅकेट घातले आहे.
या मीममधील या दोन फोटोपैकी पहिल्या फोटोवर `मॅन` तर दुसऱ्या फोटोवर `जीक्यू मॅन` असे लिहीले आहे. हे मीम त्यांनी मला फार पूर्वी पाठवले होते, असे कॅप्शन बबीलने फोटो पोस्ट करताना दिले आहे.
यंदा दिवाळीच्या निमित्ताने बाबीलने इरफान खान यांचा हातात मोर असलेला हसतानाचा फोटो शेअर केला होता. मला असे वाटते की तुम्ही दीर्घकाळासाठी शूटिंगला गेला आहात. या शूटचे शेल्ड्यूल पाण्याखाली असून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत याल, असे या पोस्टमध्ये बबील याने लिहीले होते. यापूर्वी देखील बाबीलने आपल्या त्याच्या आईवडिलांचे दुर्मिळ असे फोटो भावनिक पोस्ट लिहीत शेअर केले आहेत. या फोटोंना देखील चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला.
इरफान खान यांचे एप्रिलमध्ये मुंबईत इंडोक्रोनाईन ट्युमर या आजाराने निधन झाले. त्यांनी हिंदी सिनेमांबरोबरच ब्रिटीश आणि हॉलिवूडपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. सलाम बॉम्बे, मकबूल, लाईफ इन ए मेट्रो, लंच बॉक्स, पानसिंग तोमर, हैदर, हिंदी मिडीयम हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले. पानसिंग तोमर या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. त्याचबरोबर स्लमडॅग मिलेनियर, द नेमसेक, लाईफ ऑफ पाय आदी आंतराष्ट्रीय सिनेमांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. कसदार अभिनयामुळे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता.