Home /News /entertainment /

'अम्मा मला नेण्यासाठी आली आहे', इरफान खानचे हृदय हेलावून टाकणारे शेवटचे शब्द

'अम्मा मला नेण्यासाठी आली आहे', इरफान खानचे हृदय हेलावून टाकणारे शेवटचे शब्द

इरफान खानच्या जाण्याने आज संपूर्ण देश हळहळला. त्याच्या चाहत्यांसाठी, बॉलिवूडसाठी हा एक खूप मोठा धक्का आहे.

    मुंबई, 29 एप्रिल : 2020 या वर्षामध्ये घडलेली आणखी एक वाईट बातमी म्हणजे अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) याचा मृत्यू. 29 एप्रिल 2020 रोजी या 'मकबूल'ने जगाचा निरोप घेतला. कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मंगळवारी Colon Infection मुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. इरफानच्या जाण्याने हा बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. इरफानच्या जाण्याने अनेकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं आहे. बॉलिवूडमधील कलाकार, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, नेतेमंडळी, खेळाडू आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. अनेकांना अद्याप ही गोष्ट खरंच घडली आहे यावर विश्वास देखील बसत नाही आहे. (संबंधित-'मला मृत्यू केव्हाही कवटाळू शकतो',कॅन्सरशी लढणाऱ्या इरफानने केलं होतं वक्तव्य) इरफानच्या पीआर टीमने माहिती दिल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या टीमने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, '2018 मध्ये इरफान खान यांना एका दुर्मिळ कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून ते या आजाराशी लढत होते. इरफान खान यांच्या लढ्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली होती.  अतिशय दुःखी अंतःकरणाने ही बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.'  यातील माहितीनुसार त्यांना वर्सोव्यातील कब्रस्तानमध्ये दुपारी 3 वाजता दफन करण्यात आले. यावेळी घरातील काही निवडक सदस्य उपस्थित होते. (संबंधित-इरफानच्या मृत्यूनंतर अमिताभ बच्चन भावूक, सोशल मीडियावर केली ही पोस्ट शेअर दरम्यान स्पॉटबॉयने दिलेल्या एका बातमीनुसार, 'अम्मा मला नेण्यासाठी आली आहे', हे इरफान खान यांचे शेवटचे शब्द होते. इरफान खान यांच्या आईचं वयाच्या 95व्या वर्षी जयपूर याठिकाणी 26 एप्रिल 2020 रोजी निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफानला त्याठिकाणी पोहचता आलं नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच त्यांनी आईचं शेवटचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर चारच दिवसात इरफानने देखील जगाला अलविदा केल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इरफानने जरी जगाचा निरोप घेतला असला तरी त्याच्या अभिनयाचा, चित्रपटांचा खजिना तो सर्वांसाठी ठेवून गेला आहे. त्याचा जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. संपादन- जान्हवी भाटकर

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या