मुंबई, 14 नोव्हेंबर: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी बऱ्याच काळापासून डिप्रेशनचा सामना करत होती. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. इरा खानने (Ira Khan) आपल्या डिप्रेशनबाबत कोणताही संकोच न बाळगता बोलायचं ठरवलं आहे. मेंटल हेल्थ आणि डिप्रेशनवर भाष्य करणाऱ्या व्हिडीओंची सीरिज ती बनवत आहे. नुकताच तिने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
इरा खान या व्हिडीओमध्ये म्हणते, ‘डिप्रेशन या अवस्थेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेग-वेगळा असू शकतो. मी माझ्या आई वडिलांना जेव्हा नैराश्याबद्दल सांगितलं होतं तेव्हा त्यांनी काही वेगळी प्रतिक्रिया दिली होती. जेव्हा मी किरण आंटीला विचारलं तेव्हा तिने मला वेगळा सल्ला दिला.’ इराने जेव्हा किरण रावला डिप्रेशनबद्दल विचारलं होतं तेव्हा तिने सांगितलं होतं, ‘कामात जास्त व्यस्त राहू नकोस. एका जागेवरुन दुसऱ्या जागी जाणं टाळ. हळू हळू कामं कर.’
काही लोकांनी तिला सल्ला दिला होता की, ‘सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहात जा. कामात स्वत:ला व्यस्त ठेव. व्यायाम करत जा.’ पण तीन - चार डॉक्टरांना भेटल्यानंतर मला समजलं कामात जास्त व्यस्त राहणं योग्य नाही.
इरा खानने या आधी जो व्हिडीओ शेअर केला होता त्यात ती म्हणाली होती, ‘मी लहान असतानाच माझ्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला. ते वेगळे झाले. त्यांनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पण आपले आई – वडील वेगळे झाले आहेत ही गोष्ट माझ्या मनामध्ये घर करुन राहिली होती. मी एकटी राहायचे. माझ्या मित्र मैत्रिणींमध्येही मी मिसळायचे नाही. लहान असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. या गोष्टीचाही माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.’ इराने शेअर केलेल्या व्हिडीओंना अनेक लाइक्स मिळत आहे. आपल्या देशात मानसिक अवस्थेबद्दल फारसं बोललं जात नाही. पण इरा खानने खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे.