शनायाला घडवणारा सांगतोय, अशा मुली अनेक काॅर्पोरेट्समध्ये भेटतात

शनायाला घडवणारा सांगतोय, अशा मुली अनेक काॅर्पोरेट्समध्ये भेटतात

शनाया, राधिका आणि गुरू यांचे फॅन्स खूप आहेत. आपण मालिकांमधल्या कलाकारांना नेहमीच भेटत असतो, पण या वेळी आम्ही गाठलं या व्यक्तिरेखांना निर्माण करणाऱ्या अभिजीत गुरूला.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : सध्या माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका तुफान लोकप्रिय आहे. शनाया, राधिका आणि गुरू यांचे फॅन्स खूप आहेत. आपण मालिकांमधल्या कलाकारांना नेहमीच भेटत असतो, पण या वेळी आम्ही गाठलं या व्यक्तिरेखांना निर्माण करणाऱ्या अभिजीत गुरूला. अभिजीत म्हणजेच मालिकेतला केडी. तो ही मालिका लिहितो.

अभिजीत म्हणाला, 'सुरुवातीला झी मराठीनं आम्हाला संकल्पना सांगितली होती. पती,पत्नी और वो. या विषयावर बरेच सिनेमे आलेत, गेला माधव कुणीकडेसारखी नाटकं आलीयत. पण आम्हाला ही मालिका इमोशनल करायची नव्हती. एन्टरटेनिंग करायची होती.'

अभिजीत पुढे म्हणाला, ' पुरुषाची एक जात असते. बायको कितीही छान असली तरी काही दिवसांनी त्याला ती रुटिन वाटू शकते. त्याला स्पाइस हवा असतो. असे पुरुष बरेच असतात. तेच आम्ही मालिकेत आणलंय.'

शनायाची निर्मिती कशी झाली, याबद्दल अभिजीत खूप इंटरेस्टिंग सांगत होता. तो म्हणाला, 'शनायासारख्या मुली बऱ्याचदा काॅर्पोरेटमध्ये दिसतात. त्या खूप बालिश असतात. सेल्फी काढणं, नेलपेंट लावणं यातच रमतात. अशा मुली नेहमीच कुठेतरी बघितल्यासारख्या वाटतात. ' अभिजीतनं शनाया यातूनच तयार केली.

शनायाचा राग येत नाही कधी, यावर अभिजीत म्हणतो, ' ती दुष्ट, कनिंग बनणार नाही, याची आम्ही काळजी घेतलीय. ती मूर्ख आहे, पण दुष्ट नाही.'

शनायाची भूमिका अगोदर रसिका करत होती, आता ईशा करते. हा बदल होताना व्यक्तिरेखेतही काही बदल करावे लागले का? अभिजीत गुरू सांगतो, ' रसिकानं मालिका सोडायचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे शनायासाठी अभिनेत्री मिळत नव्हती. पण ईशानं ते चांगलं पेललं. सुरुवातीला ती विचारून करायची.'अभिजीत म्हणतो, व्यक्तिरेखा ही नेहमीच कलाकारांपेक्षा मोठी असते.

डेली एपिसोड लिहिणं म्हणजे एक कारखानाच असतो. अनेक गोष्टी लेखकाच्या हातात नसतात. अभिजीत सांगत होता, सुरुवातीला राधिका, तिचा भाऊ आणि वहिनी यांचा इमोशनल ट्रॅक दाखवला होता. पण त्यावेळी आमचं रेटिंग पडलं. प्रेक्षकांना शनाया, गुरू आणि राधिका यांच्या मध्ये कुणीच येऊ नये असं वाटतं. मग आम्ही भावाचा ट्रॅक घेतला नाही पुन्हा.

राधिका 300 कोटींची मालकीण यावर बरीच टीका होते. अभिजीतचं म्हणणं असं की, असे अनेक मसालेवाले आहेत ज्यांची वार्षिक उलाढाल याहूनही जास्त आहे. मग राधिकाची का नाही? पुन्हा एवढी टीका होतेय, याचा अर्थ प्रत्येक एपिसोड पाहतायत. ही खूप चांगली गोष्ट नाही का?'

शिवाय टीका करणाऱ्यांना अभिजीत काही प्रश्नही विचारतोय. तो म्हणतो, ' तुम्हाला हे खोटं का वाटतं? एका गृहिणीनं केलं म्हणून? अजूनही तुम्ही स्त्रीला कमी समजता?'

कुठल्याही मालिकेचा शेवट ठरला तर मला आवडेल, असं अभिजीत म्हणतो. तो पुढे म्हणतो, 'तसं होत नाही. टीआरपी वाढला तर मालिकाही वाढवावी लागते.  100 ते 150 लोकांची पोटंही त्यावर असतात.'

मालिका लिहिताना खूप बंधनं असतात, असंही अभिजीत म्हणतो. 'चुकीच्या गोष्टी दाखवता येत नाहीत. गाडी चालवताना फोनवर बोलणं, लहान मुलांवर हात उचलताना दाखवता येत नाही. चॅनेलचा फाॅर्म्युलाही ठरलेला असतो. एखादी सुसंस्कृती महिला आपल्या मित्राचा हात धरते, असं काही दाखवता येत नाही. शिवाय कलाकारांच्या उपलब्धीप्रमाणे सीन लिहावे लागतात. तारेवरची कसरत असते अगदी.'

अभिजीतची बायको समिधा याच क्षेत्रातली. पण शनायासारखी व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या नवऱ्याबद्दल तिला कधी शंका तर येत नाही? असं त्याला गमतीनं विचारलं असता तो म्हणाला, 'माझ्या वागणुकीवरून ती मला जज करेल, माझ्या लिखाणावरून नाही.'

शनायाचा मित्र केडी साकारताना अभिजीतनं सगळ्याच व्यक्तिरेखा उभ्या केल्यात. त्यानं देवयानी, अवघाचि संसार, पुढचं पाऊल या मालिकाही लिहिल्यात. अभिजीतच्या लेखणीतून शनाया आणि राधिका कशा पुढे भेटत जातील, हे कळेलंच.

---सोनाली देशपांडे

First published: February 19, 2019, 8:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading